लुसि कुरियन यांना यशवंतरत्न पुरस्कार प्रदान

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे अनाथ मुले व महिलांसाठी कार्य करणाऱ्या माहेर संस्थेच्या संस्थापिका व समाजसेविका लुसि कुरियन यांचा नुकताच यशवंतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या संस्थापिका असलेल्या लुसि कुरियन यांनी अद्याप पर्यंत अनेक अनाथ, निराधार, विधवा, रस्त्यावर फिरणाऱ्या महिलांचा तसेच पुरुष व मुलांचा सांभाळ करण्याचे काम हाती घेत अनेकांना मायेचा आधार दिला असून सध्या त्यांच्या 3 राज्यांमध्ये तब्बल 25 शाखेंद्वारे काम सुरु आहे.

लुसि कुरियन व माहेर संस्थेला अद्याप पर्यंत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, देश, राज्य पातळीवर शेकडो पुरस्कार प्राप्त झालेले असून जगातील प्रेरणादायी व्यक्तींच्या यादीमध्ये लुसि कुरियन यांचा बारावा क्रमांक लागला आहे. नुकताच यशवंतराव होळकर जयंतीच्या निमित्ताने लुसि कुरियन यांना महाराजा यशवंतराव होळकर गौरव समितीच्या वतीने यशवंतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, विठ्ठल जाधव, माजी मंत्री राम शिंदे, इतिहासकार अविनाश धर्माधीकारी, दत्तात्रय कोहिनकर, यशवंतराव होळकर गौरव समितीचे अध्यक्ष विजय गोखले, माहेर संस्थेचे व्यवस्थापक रमेश चौधरी, पूजा ठाकूर यांसह आदी उपस्थित होते. लुसि कुरियन यांना यशवंतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याने माहेर संस्थेतील सर्व अनाथ मुले, कर्मचारी व महिलांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.