भक्ष्याच्या शोधात आला अन् कोंबड्यांच्या जाळ्यातच अडकला… 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

न्हावरेत मध्यरात्री बिबट्याचा थरार; वनविभागाचे धाडसी रेस्क्यू ऑपरेशन!

न्हावरे (अक्षय टेमगिरे): रात्रीची वेळ… सर्वत्र शांतता… अन् अचानक कोंबड्यांचा जोरदार आरडाओरडा! घराबाहेर नेमकं काय घडलंय, हे पाहण्यासाठी बाहेर आलेल्या शेतकऱ्याला समोरचं दृश्य पाहून धक्काच बसला. कारण कोंबड्यांच्या जाळ्यात चक्क बिबट्या अडकला होता!

हि घटना आहे शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील कांडगे वस्तीवरील. बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात आलेल्या अंदाजे एक वर्षाच्या बिबट मादीची कोंबड्यांच्या जाळ्यात चांगलीच कोंडी झाली. बाहेर पडण्याचा मार्ग नसल्याने बिबट्या जाळ्यातच अडकून पडला होता.

घरमालक बाळासाहेब जगदाळे यांनी प्रसंगावधान राखत तातडीने शिरूर वनविभागाला याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि वन्यजीव बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मध्यरात्रीच्या अंधारात बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे मोठे आव्हान पथकासमोर होते. मात्र, कोणतीही घाईगडबड न करता अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्याने रेस्क्यू मोहीम राबविण्यात आली

अखेर वनविभागाच्या पथकाला बिबट मादीला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुस्थितीत असलेल्या बिबट मादीची पुढील देखभाल आणि उपचारासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात रवानगी करण्यात आली. मात्र, या घटनेने न्हावरे परिसरात बिबट्याच्या वावराचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत