शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असून आता चोरट्यांनी थेट शहराच्या मध्यवर्ती आणि कायम गजबजलेल्या मुंबई बाजारपेठेलाच लक्ष्य केले आहे. भरदिवसा बंद घराची खिडकी फोडून शहरातील प्रसिद्ध वकील ॲड. शिरीष भिकाजी लोळगे यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. सुमारे दोन तोळे सोन्याचे दागिने आणि तब्बल २ लाख १० हजार रुपयांची रोकड असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटनेमुळे शिरूर शहरात एकच खळबळ उडाली असून, आता शहरातील नागरिकांची घरेही सुरक्षित राहिली आहेत का ? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
ॲड. लोळगे हे मुलगा आदित्य आणि सुनेसह नातेवाईकाच्या विवाह समारंभासाठी पुणे येथे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी मागील बाजूने घरात प्रवेश केला. शेजारील मोकळ्या जागेतून वाड्याच्या भिंतीवरून उडी मारून चोरट्यांनी स्वयंपाकघराची खिडकी फोडली. त्यानंतर घरात प्रवेश करून कपाटातील दोन लाख दहा हजार रुपयांची रोकड आणि दुसऱ्या खोलीतील सोन्याचे दागिने लंपास केले. विशेष म्हणजे, घराचा मागील दरवाजा उघडून इतर साथीदारांनाही आत घेतल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
लोळगे कुटुंबीय घरी परतल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. घरातील कपाटे उचकटलेली, सामान अस्ताव्यस्त आणि मागील बाजूचा दरवाजा उघडा दिसताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले असून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
भर बाजारपेठेतच घर सुरक्षित नाही, तर सामान्य नागरिकांनी कोणाच्या भरवशावर राहायचे? असा सवाल उपस्थित होत आहे.
View this post on Instagram
शिरूर शहरात यापूर्वीही चोरी, घरफोडी आणि संशयास्पद हालचालींच्या तक्रारी समोर येत आहेत. शहरातील विविध भागांसह उपनगरांमध्ये रात्रीच्या वेळी चोरटे फिरत असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहेत. मात्र, आता भरदिवसा शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेतच घरफोडी होण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. यामुळे पोलिसांच्या गस्तीचा आणि गुन्हेगारांवरील वचकाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरात पोलीस यंत्रणा कार्यरत असताना चोरट्यांना अशा प्रकारे घरफोडी करण्याचे धाडस कसे होते? संशयितांवर लक्ष ठेवणारी यंत्रणा सक्रिय आहे का? रात्रीची गस्त केवळ कागदावरच आहे का? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. शिरूर पोलिसांनी या घटनेचा तपास वेगाने करून चोरट्यांना तातडीने जेरबंद करावे, शहरातील संवेदनशील भागांत पोलिसांची नियमित गस्त वाढवावी, सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
दरम्यान, चोरट्यांचा बंदोबस्त कधी होणार? की नागरिकांनी आता स्वतःच आपल्या घराच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यायची? भर बाजारपेठेतील या घरफोडीने शिरूरच्या कायदा-सुव्यवस्थेसमोर पुन्हा एकदा मोठे आव्हान उभे केले आहे.
शिरूर! ‘आपले सरकार’ निवडीच्या मूल्यांकनामध्ये मनमानी; अनेकांच्या तक्रारी…
शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…
शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…