शिरुर पोलिस स्टेशनचा एक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी निलंबित; पोलिस दलात खळबळ

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) करडे येथील माजी सैनिक पत्नी एका कंपनीत भागीदार असताना तिची आर्थिक फसवणुक करत बनावट कागदपत्रे बनवुन तिचा राजीनामा घेत तिला कंपनीच्या भागीदारीतुन काढुन टाकण्यात आले होते. याबाबत शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर वारंवार आरोपीच्या संपर्कात राहुन त्यांना मदत केल्याप्रकरणी शिरुर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक हणमंतराव शिवाजी गिरी तसेच पोलिस हवालदार नारायण भिमराव जाधव यांना पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी निलंबित केले आहे.

 

करडे (ता. शिरुर) येथील डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Wsquare feeds india private limited) या कंपनीत एका माजी सैनिकाची पत्नी कंपनीत भागीदार असताना बनावट कागदपत्रे बनवुन तिचा राजीनामा घेत तिला कंपनीच्या भागीदारीतुन काढुन टाकण्यात आले होते. याबाबत रेश्मा राहुल वाळके (वय ३७) रा. करडे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे चार जणांविरोधात २७ जानेवारी २०२५ रोजी फिर्याद दाखल केली असुन ४० दिवस उलटुनही यातील चारही आरोपी अद्याप फरारच आहे.

 

सदर गुन्ह्यामध्ये प्रियंका संभाजी वाळके, संभाजी दगडु वाळके आणि सचिन संभाजी वाळके व इतर आरोपी आहेत. यातील आरोपीना शिरुर पोलिस स्टेशनमधील एक वरिष्ठ अधिकारी मदत करत असल्याची लेखी तक्रार माजी सैनिक पत्नीने पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्याकडे केली होती. त्याच अनुषंगाने आरोपी सचिन संभाजी वाळके याच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढुन सदर कॉल डिटेल्सचे अवलोकन केले असता, त्यामध्ये दि. ७ नोव्हेंबर २०२४ पासुन ते दि. २९ जानेवारी २०२५ या दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक हणमंतराव गिरी यांनी आरोपी सचिन वाळके याला एकुण ७९ कॉल्स केलेले आढळून आले आहेत. तर दि ३० नोव्हेंबर २०२४ पासुन ते दि. २९ जानेवारी २०२५ या दरम्यान पोलिस हवालदार नारायण जाधव यांनी त्यांच्या फोन वरुन आरोपी सचिन वाळके याला एकुण २५ कॉल्स केल्याचे आढळून आले आहे.

 

त्यामुळे हणमंतराव गिरी आणि नारायण जाधव यांनी कोणत्याही समर्थनीय कारणाशिवाय गंभीर गुन्ह्यातील आरोपी यांच्या संपर्कात राहुन अत्यंत बेशिस्त व बेजबाबदार गैरवर्तन केलेले असल्याचे दिसुन आलेले असल्याने सदर प्रकरणात त्यांनी दाखवलेल्या संशयीत वर्तनाबद्दल त्यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कारवाई करत त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

 

सर्वसामान्य नागरिकांकडुन कारवाईचे स्वागत…

शिरुर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक हणमंतराव गिरी आणि पोलिस हवालदार नारायण जाधव यांच्यावर पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक यांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे. करडे येथील माजी सैनिक पत्नीची आर्थिक फसवणुक झालेली असताना एकीकडे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे आणि तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सागर शेळके हे आरोपीचा शोध घेत असताना त्याच पोलिस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचारी आरोपीच्या संपर्कात राहुन त्यांना मदत करत होते. त्यामुळे ‘जर कायद्याचे रक्षकच भक्षक व्हायला लागले.’ तर दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला होता. परंतु या दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे आता इतर पोलिस कर्मचाऱ्यांना वचक बसणार आहे.

 

‘शिरुर तालुका डॉट कॉम’ वर कौतुकाचा वर्षाव…

करडे (ता. शिरुर) येथील माजी सैनिक पत्नीची आर्थिक फसवणुक झाल्याप्रकरणी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने सुरवाती पासुनच ‘रोखठोक’ आणि ‘निर्भीड’ भुमिका घेतली होती. तसेच शिरुर पोलिस स्टेशनमधील भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याबाबतही सडेतोड वृतांकन केले होते. पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक यांनी शिरुर पोलिस स्टेशन मधील एक अधिकारी आणि एक कर्मचारी यांना निलंबित केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ वर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

शिरुर; माजी सैनिकाच्या पत्नीची कंपनीच्या भागीदारीत फसवणुक करत जिवे मारण्याची धमकी

कुणी न्याय देईल का न्याय; माजी सैनिकाच्या पत्नीची आर्त हाक; आरोपी अद्यापही मोकाट

माजी सैनिक पत्नीच्या आर्थिक फसवणुक प्रकरणी आमदारांच्या फोन नंतरही आरोपीना अटक नाहीच; पोलिसांची भुमिका संशयास्पद…?

शिरुर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर माजी सैनिक पत्नीचा गंभीर आरोप; पोलिस अधिक्षकांकडे तक्रार

शिरुर; माजी सैनिक पत्नीच्या फसवणुक प्रकरणात झारीतील शुक्राचार्य असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची लुडबुड सुरुच…?