कोंबडयावर ताव मारण्यासाठी आला अन बिबट्या खुराड्यात अडकला

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे ) कवठे येमाई ता. शिरूर येथील इनामवस्ती येथे शनिवार (दि. १९ ) रोजी रात्री दहा वाजता बिबट्याने अक्षय कांदळकर यांच्या कोंबड्याच्या खुरड्यात कोंबडयावर ताव मारण्यासाठी खुराड्यात प्रवेश करून दहशत निर्माण केली आहे. थंडीमुळे कांदळकर यांचे घर बंद होते. त्यांच्या घराशेजारी कोंबड्यांचे खुराडे बनविलेले आहे. कोंबड्यांचा जोर जोराचा आवाज आल्याने कांदळकर यांनी बाहेर येऊन पाहिले असता त्यांना कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्या दिसून आला. त्यांनी आरडाओरडा केला असता बिबट्याने खुरड्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला बाहेर निघणे कठीण झाले. खुराड्याला छोटा दरवाजा असल्यामुळे बिबट्या जवळपास दहा मिनिटे खुराड्यात अडकून पडला.

यावेळी बिबट्याने बाहेर निघण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्याला दरवाजाचा मार्ग न सापडल्याने त्याने अखेर खुराड्याचे पत्रे उचकटून बाहेर उडी मारली. आणि उसाच्या शेतात धूम ठोकली. अक्षय बाहेर येण्यापूर्वीच बिबट्याने तीन कोंबड्या खाऊन फस्त केल्या होत्या. त्यांच्या खुराड्यातील उर्वरित कोंबड्या जखमी झालेल्या आहेत. या दरम्यान आरडाओरडा झाल्याने स्थानिक इनाम वस्तीतील रहिवाशांनी तिथे गर्दी केली होती. मात्र उजेडात बिबट्याने खुराड्यात केलेला प्रवेश बघून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच सविंदणे येथील अक्षय अर्जून शिंदे यांच्या घराशेजारील कोबंडयाच्या खुराड्याजवळ बिबटया दिसल्याने परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या भागातील बहुतांश शेतकरी हे शेतात राहत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढला असून पशुधनाबरोबरच माणसांवरही हल्ले झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे या भागात पिंजरा लावून बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.