शिक्रापुरात बाजार मैदानात कचरा अन आठवडे बाजार रस्त्यावर

शिरूर तालुका

शिक्रापूरच्या कचरा समस्येनंतर आता बाजार प्रश्न ऐरणीवर

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कचरा प्रश्न नेहमी चर्चेत असताना सध्या कचऱ्याचे ढीग चक्क बाजार मैदानात साचले असल्याने येथील आठवडे बाजार चक्क रस्त्यावर भरवण्याची वेळ आली असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने बाजार मैदान खुले करण्याची मागणी नागरिक करत आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कचरा प्रश्न काही केल्या मार्गी लागत नसताना सध्या शिक्रापूर येथील संकलित होणारा कचरा चक्क बाजार मैदानात टाकण्यात येत असल्यामुळे पूर्ण बाजार मैदान कचऱ्याने व्यापले गेले आहे. बाजार मैदानात कचरा टाकण्यात येत असल्याने रविवारी भरवण्यात येणारा बाजार चक्क येथील रस्त्यावर तसेच गावातील जुन्या ब्रिटीशकालीन पुलावर भरवण्यात येत आहे. रस्त्यावर बाजार भरवण्यात येत असल्याने बाजारामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गर्दीतून वाट काढत महिलांना चालण्याची वेळ आली आहे. रस्त्यावर बाजार भरला जात असताना देखील ग्रामपंचायत कडून भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या नागरिक तसेच विक्रेत्यांकडून ५० ते २०० रुपये पावती वसूल केली जात आहे. मात्र पैसे वसूल करत असताना देखील नागरिकांना पाणी, स्वच्छता गृह यांची सुविधा ग्रापंचायत कडून पुरवली जात नसल्याचे दिसून येत आहे.

सध्या शिक्रापूर मधील कचरा प्रश्नाबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली असताना आता कचऱ्याप्रमाणे आता बाजाराची समस्या देखील गंभीर होत असून सक्तीने कर वसूल करणाऱ्या विक्रेत्यांसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने बाजार मैदान खुले करत वाहतुकीसाठी तसेच नागरिकांना ये जा करण्यासाठी रस्ता खुला करुन देण्याची मागणी नागरिक करत आहे.

पैसे घेता मग सुविधा द्या…
शिक्रापूर येथील आठवडे बाजारात आमच्याकडून पैसे वसूल केले जातात मात्र आम्हाला पाणी देखील पुरवले जात नाही. मात्र सध्या बाजार मैदान बंद झाल्याने बाजार पुलावर भरवला जात आहे त्यामुळे आम्हाला त्रास होतो. ग्रामपंचायत पैसे घेते मग आम्हाला सुविधा द्याव्यात, असे एका भाजी विक्रेत्याने यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

शिक्रापूर येथील बाजार मैदानात साचलेला कचरा हटविण्याचे काम सध्या सुरु असून २ दिवसांत येथील सर्व कचरा हलवला जाईल. त्यांनतर बाजार मैदान स्वच्छ करुन त्या जागेवर बाजार भरवला जाईल, असे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.