शिरुर तालुक्यात भाडेकरुंची अद्ययावत माहिती नसल्याने गुन्हेगारीला मिळतेय बळ…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात मोठया प्रमाणात औद्योगिक वसाहत वाढली असुन कोरेगाव भिमा, वढू बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापुर, कोंढापुरी, रांजणगाव, करडे या ठिकाणी लाखों कामगार काम करतात. परंतु ते ज्या गावात भाड्याने खोल्या घेऊन राहतात. त्या खोली मालकांकडे (काही अपवाद वगळता) भाडेकरुंची अद्ययावत माहितीच उपलब्ध नसल्याने गुन्हेगारीला बळ मिळत असुन रांजणगाव, कारेगाव, ढोकसांगवी परिसरात अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा मुक्तसंचार असल्याची दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु आहे.

शिरुर तालुक्यात औद्योगिक वसाहतीत उदरनिर्वाह करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यासह इतर राज्यातून मोठया प्रमाणात कामगार येत असतात. परंतु ते ज्या ठिकाणी भाडेकरु म्हणुन राहतात. त्या मालकांकडे त्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध असायला हवी. परंतु अनेक वेळा भाड्याच्या हव्यासापोटी खोलीमालक या कामगारांची संपुर्ण माहिती न घेता त्यांना खोली देतात. परंतु बऱ्याचवेळा हे लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात. त्यामुळे त्यांच्या आसपास राहणाऱ्या लोकांना विनाकारण त्यांचा त्रास सहन करावा लागतो.

लिव्ह इन रिलेशन मध्ये राहण्याच प्रमाण वाढतंय…?
कोरेगाव भिमा, शिक्रापुर, रांजणगाव, कारेगाव या ठिकाणी अनेक जोडपी बेकायदेशीररीत्या लिव्ह इन रिलेशन मध्ये राहत असुन त्यातून अनेकवेळा लग्नापूर्वीच मुली गरोदर राहण्याच प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यात अनेकवेळा बेवारस बालके सापडली आहेत. तसेच लिव्ह इन मधलं नात संपुष्टात आल्यानंतर विनयभंग, बलात्कार अशा प्रकारच्या केसेस विनाकारण पोलिस स्टेशन मध्ये दाखल होत आहेत.

मेडिकल मध्ये नको त्या औषधांचा खप…?
कोरेगाव भिमा, शिक्रापुर, रांजणगाव, कारेगाव या ठिकाणी मोठया प्रमाणात कामगांराचे वास्तव्य असल्याने मेडिकल व्यवसाय जोमात असुन मेडिकल मध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच नको ती औषध आणि नको त्या गोळ्यांचा सर्रास मोठ्या प्रमाणात खप होत आहे. मेडिकल स्टोअर मध्ये कमी वयोगटातील मुला मुलींना जास्त प्रमाणात शुल्क आकारुन नको ती औषध दिली जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तसेच शिरुर तालुक्यातील अनेक मेडिकल स्टोअर मध्ये शैक्षणिक अहर्ता नसलेल्या व्यक्ती काम करत असल्यामुळे हा सगळा “सावळा गोंधळ” चालु असताना यावर नियंत्रण आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग (ड्रॅग इन्स्पेक्टर) कडक उपाय योजना कां करत नाहीत. असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाढतेय गुन्हेगारी…?
शिरुर तालुक्यात शिरुर, रांजणगाव एमआयडीसी, शिक्रापुर या तीन पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोठया प्रमाणात चोऱ्या, लूटमार, दरोडे, मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक बिल्डिंगच्या मालकाकडे अनेकवेळा त्याच्या भाडेकरुंची माहितीच उपलब्ध नसल्याने तसेच अनेक बिल्डिंगमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध नसल्याने पोलिसांना गुन्हेगार शोधण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांची अद्ययावत माहिती संबंधित ग्रामपंचायत किंवा खोली मालकाकडे उपलब्ध असणे गरजेचे असुन त्यामुळे गुन्हेगारीला बऱ्यापैकी वचक बसणार आहे.
(क्रमश:)