तळेगाव दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची लुट

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात जमिनींना सोन्याचे भाव आलेले असल्याने अनेकदा दुय्यम, निबंधक कार्यालयात नागरिकांची वेगवेगळ्या कारणाने गर्दी झालेली असताना दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकाऱ्यांकडून खाजगी वकिलांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह नागरिकांची आर्थिक लुट होत असल्याची तक्रार नोंदणी महानिरीक्षकांसह मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे दुय्यम निबंधक कार्यालय असून येथे नेहमी जमिनीचे खरेदी, विक्री, हक्कसोड यांसह आदी कामांचे दस्त बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असते. मात्र सदर ठिकाणी दस्त नोंदणी तसेच वडिलोपार्जित जमिनीचे हक्कसोड करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी अधिकारी हे खाजगी एजंट तसेच वकिलांच्या मार्फत आर्थिक लुट करत असून शेतकऱ्यांना तासनतास ताटकळत उभे ठेवत आहेत.

तसेच वशिला लावणाऱ्या वकिलांचे दस्त तातडीने करुन दिले जात असल्याची तक्रार पिंपळे खालसा येथील शेतकरी सचिन धुमाळ यांनी नोंदणी महानिरीक्षक यांच्या सह मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या सह मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयाचा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे.

याबाबत दुय्यम निबंधक कार्यालयाचे अधिकारी सुनील पिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता असे प्रकार येथे घडत नसल्याचे सांगत या प्रकरणाला दुजोरा त्यांनी दिला आहे.