शिरुर तालुक्यात ॲमेझॉनच्या पार्सलचे लाखो रुपये घेऊन कामगार फरार

मुख्य बातम्या

शिक्रापुर (शेरखान शेख) शिक्रापुर (ता. शिरुर) येथील ॲमेझॉनच्या ऑफिस मध्ये कामाला असलेला कामगार ॲमेझॉनच्या वस्तूंचे 3 लाख 63 हजार रुपये घेऊन फरार झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विलास रमेश सुरडकर या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापुर येथील मलठण फाटा येथे ॲमेझॉन कंपनीच्या वस्तूंचे पार्सल नागरिकांना पुरवणारे ऑफिस असून सदर ठिकाणी विलास सुरडकर या कामाला आहे. ॲमेझॉन कंपनीच्या वस्तू नागरिकांना दिल्यानंतर गोळा होणारे पैसे विलास दररोज बँकेत भरत असे ३० नोव्हेंबर रोजी वस्तूंचे एक लाख छत्तीस हजार रुपये आलेले असताना विलास याने सर्व पैसे ऑफिसमध्ये न ठेवता स्वतः जवळ ठेवून घेतल्याचा प्रकार ऑफिस मधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. दुसऱ्या दिवशी विलास कामावर न आल्याने तसेच त्याचा फोन देखील बंद लागत असल्याने व्यवस्थापक सुमित पवार यांनी विलास राहत असलेल्या रुमवर जाऊन चौकशी केली असता काहीही माहिती मिळाली नाही.

त्यामुळे पवार यांनी ऑफिस मध्ये येत सर्व वस्तूंची व रकमेची व्यवस्थित चौकशी केली असता ऑफिस मधील तब्बल 3 लाख 63 हजार रुपये विलास याने त्याच्याजवळ घेतले आणि त्यांनतर ॲमेझॉन कंपनीचा विश्वासघात करत रक्कम घेऊन फरार झाल्याने निदर्शनास आल्याने याबाबत सुमित शंकरराव पवार (वय ३१) रा. संकल्पसिटी सोसायटी, रांजणगाव गणपती, ता. शिरुर जि. पुणे मूळ (रा. मंगलसिंग कॉम्प्लेक्स, सह्याद्रीनगर, वाई ता. वाई जि. सातारा) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी विलास रमेश सुरडकर (वय ३३) रा. मलठण फाटा, ता. शिरुर जि. पुणे मूळ (रा. रोहना ता. खामगाव जि. बुलढाणा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर हे करत आहे.