Shirur Police Station

शिरुर पोलिसांकडुन अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल होईना, दबंग आधिकाऱ्याची शिरुर पोलिस स्टेशनला गरज…?

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथे रस्त्याच्या कडेला एक पेट्रोल टाकुन एक जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून पाच दिवसात तपास करुन त्यातील आरोपी पकडण्यासाठी शिक्रापूर पोलिस तसेच गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांना अथक परीश्रम करत यश आले आहे. नात्याला काळीमा फासणारी हि घटना घडली असुन मृताची बायको आणि अल्पवयीन मुलीने तिच्या प्रियकराच्या मदतीने खुन करुन पुरावा नष्ट करण्यासाठी सदरचा मृतदेह पेट्रोल टाकुन जाळण्याचा प्रयत्न केला होता. मुलीच्या प्रेम संबंधाला विरोध केल्याने मुलीच्या आईने टोकाचे पाऊल उचलत मुलगी आणि तिच्या प्रियकराच्या साथीने आपल्या नवऱ्याचा पद्धतशीरपणे काटा काढला होता.

शिक्रापुर पोलिसांनी पाच दिवसात या गुन्ह्याचा तपास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. शिरुर तालुक्यातील शिक्रापुर आणि रांजणगाव पोलिस स्टेशनला गंभीर गुन्ह्यांच्या अनुषंगाने जलदगतीने तपास होत असताना शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अनेक गंभीर गुन्हंयाचा गेले अनेक दिवसांपासुन तपास लागलेला नाही. शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत काही महिन्यांपुर्वी अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह सापडला होता. शिरुर पोलिसांना अजुनही त्या घटनेतील आरोपीचा तपास लागलेला नाही. काही महीन्यांपुर्वी आण्णापूर येथील एका सामाजिक कार्यकर्त्याची दुचाकी गाडी जाळली गेली. या घटनेतील संशयित समोर येऊनही तपास केला जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

शिरुर शहरात गुन्हेगारी वाढली…?

शिरुर शहरात सोनसाखळी, मंगळसुत्र तसेच दुचाकी चोरट्यांनी धुमाकुळ घालत अनेक गुन्हे केले आहेत. शिरुर पोलिस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या एका पोलीसावर काही दिवसांपुर्वी हल्ला झाला. त्यातील आरोपी अद्यापही पकडला गेलेला नाही. पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे जोरात सुरु असुन गुटका, मटका यांच्यावर कारवाई होण्याच्या आधीच संबधीत अवैध धंद्यावाल्याला कारवाई होणार असल्याची टीप जात आहे. तसेच काही ठरावीक लोकांवर कारवाई करुन मोठ्या बकऱ्याना अभय दिले जात आहे. पिंपरखेड येथे दोन जबरी चोऱ्या होऊनही अदयाप त्यातील आरोपी सापडलेले नाहीत.

अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी मोकाट…

पिंपरखेड दरोडा, कवठे येमाई येथील देवाचे दागीने चोरी असे अनेक गुन्हे घडल्यानंतर आरोपी पकडले जात नाहीत. तसेच पुर्व भागात निमोणे येथे वृध्दाचा खून त्यानंतर एका कामगाराची संशयास्पद झालेली आत्महत्या, तसेच चार बेवारस मृताची अदयाप ही ऊकल झाली नाही.त्यामुळे शिरुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. तसेच न्हावरे येथील एका युवकाचा पुलावरुन नदीत ढकलून खून करण्यात आला. त्यानंतर आरोपीच्या विरोधात खून झालेल्या मुलाच्या आई-वडिलांनी दबावापोटी फिर्याद देण्याचे टाळले. या घटनेत शिरुर पोलिस स्वतः फिर्यादी झाले. मग एवढीच तत्परता शिरुर रामलिंग येथील अंजली गायकवाड यांच्या आत्महत्या प्रकरणात का दाखवली गेली नाही…? या घटनेत पोलिस का फिर्यादी झाले नाहीत…? नक्की पाणी कुठे मुरले याची चर्चा दबक्या आवाजात तालुकाभर चांगलीच रंगली आहे.

यापुर्वी शिरुर पोलिस स्टेशनला दयानंद गावडे, नारायण सारंगकर यांनी अतिशय चांगले काम केले. त्यांच्या काळात शिरुर हद्दीत चोरी, दरोडा,खुन अशा अनेक गुन्ह्यांची तातडीने उकलं करण्यात आली होती. कोणताही गुन्हा करताना आरोपी दहा वेळा विचार करत होते. एवढी या अधिकाऱ्यांची जरब होती. त्यांच्यासारख्या दंबग आधिकाऱ्याची शिरुरला गरज आहे. नाहीतर शिरुरचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही हे मात्र नक्की…(क्रमश:)