शिरुर; माता नव्हे तु वैरीणी! मातृत्वाला काळिमा फासत अकरा महिन्याच्या चिमुकल्याचा खून

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील भांबर्डे गावात घडलेल्या एका अमानुष आणि संतापजनक घटनेने शिरुर तालुक्यासह संपुर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. ज्या आईच्या कुशीत मुलगा सुरक्षित असतो, त्याच आईने आपल्या ११ महिन्यांच्या लेकराचा निर्दयीपणे जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात रवींद्र अशोक पवार (रा. भांबर्डे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी आरोपी पुजा रवींद्र पवार हिने स्वतःच्या पोटच्या मुलाचा थंड डोक्याने खून केल्याचे उघड झाले आहे. या घटनेने “आई” या नात्यालाच काळिमा फासल्याची तीव्र प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.

‘अडथळा’ वाटल्यानेच मुलाचा खून…

रांजणगाव पोलिसांनी केलेल्या पोलिस तपासात आरोपी पुजा हिने सांगितले की, कोकणातील मुरुड येथून फिरुन आल्यानंतर चिमुकला यश सतत रडत होता. याचाच राग मनात धरत तसेच मुलगा सोबत असेल तर दुसरे लग्न होणार नाही” या विकृत विचारातून तिने थेट स्वतःच्या लेकराचाच काटा काढण्याचा थरारक कट रचला. हि हकीगत ऐकल्यावर पोलिसही सुन्न झाले.

हत्या केल्यानंतर थंड डोक्याने पुरावा केला नष्ट…

आरोपी पुजाने आपला 11 महिन्याचा निष्पाप मुलगा यशचे डोके घरासमोरील सिमेंटच्या ओट्यावर आपटून त्याचा जीव घेतला. एवढ्यावरच न थांबता, गुन्हा लपवण्यासाठी तिने रक्ताचे डाग पाण्याने धुऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मृतदेह कपड्यांच्या बॅगेत कोंबला. तसेच बॅग पाण्यात बुडून राहावी म्हणून त्यात दगड टाकले आणि थेट शेतातील विहिरीत फेकून दिला. या सगळ्या गोष्टी आरोपी पुजा हिने अगदी थंड डोक्याने केल्या.

‘अकस्मात मृत्यू’च्या आड लपलेलं भीषण सत्य… 

सुरुवातीला हा प्रकार अकस्मात मृत्यू म्हणून नोंदवण्यात आला होता. मात्र पोलिसांनी सखोल तपास करताना ‘पोलिसी खाक्या’ दाखविल्यावर आई पुजाच खुनी असल्याचे सत्य बाहेर आले. शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, रांजणगावचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षण अशोक चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके यांच्यासह रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर डांगे तसेच फॉरेन्सिक टीम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासात सहकार्य केले.

समाजमन सुन्न; कठोर शिक्षेची मागणी…

आईनेच आपल्या चिमुकल्याचा जीव घेतल्याने भांबर्डे गावासह संपुर्ण शिरुर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. “असे अमानुष कृत्य करणाऱ्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे” अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके हे करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत