Shikrapur Police Station

पिंपळे जगतापला कंपनीतील दहा लाखांचा माल चोरणारे जेरबंद

मुख्य बातम्या

शिक्रापुर (शेरखान शेख) पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील एका कंपनीतील फोर्जिंगचे महागडे दहा लाखांचे जॉब चोरुन विक्री करणाऱ्या सुरक्षा रक्षकासह भंगार खरेदी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत त्यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असून सागर राजेंद्र जाधव, योगेश प्रल्हाद काकपुरे, अशोक बाळू काळे व अब्दुलगफूर आदम शेख असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पिंपळे जगताप येथे असलेल्या जि के डब्ल्यू कंपनीमध्ये फोर्जिंगच्या जॉबचे काम चाललेले असते. सदर जॉब महागडे असताना देखील कंपनीच्या तीन सुरक्षा रक्षकांनी कंपनीतील तब्बल दहा लाखांच्या फोजिंग जॉबची चोरी करत करंदी फाटा येथील एका भंगार विक्रेत्याला विक्री केली. हि बाब कंपनी व्यवस्थापकाच्या निदर्शनास येताच त्यांनी सुरक्षा रक्षक एजन्सीशी संपर्क करत माहिती दिली. त्यामुळे सुरक्षा रक्षक एजन्सीचे सचिन सोळसे यांनी कंपनीमध्ये जात सुरक्षा रक्षकांकडे विचारणा केली असता त्यांनी कंपनीतील साहित्याची चोरी केल्याची कबुली देत आम्ही सदर साहित्य अब्दुलगफूर शेख या भंगार विक्रेत्याला विक्री केल्याचे सांगितले.

याबाबत सचिन बाबुराव सोळसे (वय ४०) रा. मांजरी बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. गोदेगाव ता. कोपरगाव जि. अहमदनगर यांनी शिक्रापुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सागर राजेंद्र जाधव (वय २२) रा. करंदी ता. शिरुर जि. पुणे, मूळ रा. राळेसांगवी ता. भूम जि. उस्मानाबाद, योगेश प्रल्हाद काकपुरे (वय २६) रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. नांदुरा ता. नांदुरा जि. बुलढाणा, अशोक बाळू काळे (वय ३१) रा. टाकळी भीमा ता. शिरुर जि. पुणे, अब्दुलगफूर आदम शेख (वय ३०) रा. करंदी फाटा ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. महात्मा फुले नगर चाकण ता. खेड जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत चौघांना अटक करून शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौघांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भरत कोळी हे करत आहे.