शिरूर (किरण शेलार): रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने पारंपरिक सणांना सामाजिक जाणिवेची जोड देत नागपंचमीचा सण यावर्षी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. गावातील भिल्ल वस्तीतील वंचित मुलांना दूध देऊन सण साजरा करण्यात आला.
नागपंचमी हा सण ग्रामीण भागात श्रद्धेने साजरा केला जातो. वारुळाची पूजा करताना महिलांकडून दूध व लाह्या वाहिल्या जातात. मात्र, नाग दूध पितो ही समजूत अंधश्रद्धा असून, या अन्नाचा सदुपयोग गरजूंसाठी व्हावा, या उद्देशाने संस्थेने हा उपक्रम राबवला. “दूध नागाच्या तोंडात न जाता वाया जाते. त्याऐवजी तेच दूध गरजू मुलांच्या मुखात गेल्यास त्यांचा आरोग्यदृष्ट्या खरा फायदा होईल, अशा उपक्रमांमुळेच सण साजरे करण्याला अर्थ प्राप्त होतो,” असे मत संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी व्यक्त केले.
यावेळी महिलांनी मुलांसोबत झोके घेत आनंद व्यक्त केला. मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला हास्य आणि उत्साह पाहून महिलाही भारावून गेल्या. कार्यक्रमात अर्चना कर्डिले, माया रेपाळे, छाया जगदाळे, मीनल लेकुरवाळे, सायली जगदाळे आदी महिला सक्रियपणे सहभागी झाल्या.