शिरुरमध्ये गाडीची काच फोडून एक लाखाचा ऐवज लंपास

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शिरूर शहरासह सोनसाखळी, वाहनचोरांनी सध्या चांगलाच धुमाकुळ घातला असून पार्किंग केलेल्या गाडीच्या काचा फोडून ऐवज लंपास केला जात आहे. पुणे-अहमदनगर रोडवर शिरुर हद्दीतील समर्थ लॉन्स मंगल कार्यालयाच्या पार्कींगमध्ये पार्क केलेली स्वप्नील गजानन घरडे (रा. खराडी, चंदननगर बायपास) यांच्या कारच्या दरवाज्याची काच फोडून गाडीतील सुमारे एक लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि 7) फेब्रुवारी रोजी दुपारी 1 ते 4 वाजण्याच्या सुमारास शिरुर गावच्या हददीत असणाऱ्या श्री समर्थ लॉन्स मंगल कार्यालय अहमदनगर ते पुणे हायवे रोडच्या बाजुला पार्क केलेल्या गाडीची काच फोडून गाडीतील दोन लॅपटॉप तसेच 12 हजार रुपये रोख, पत्नीचे आधार कार्ड असा एकुण 99 हजार 500 रुपये किंमतीचा माल अज्ञात चोरट्याने चोरुन नेला असुन याबाबत शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस फौजदार चव्हाण हे करत आहेत.