एकवीस दिवसात सेझ बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्के काढणार…

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर आणि खेड तालुक्यातील 4 गावातील सेझच्या दुसऱ्या टप्प्यातील 4 शेतकऱ्यांच्या सुमारे 4 हजार एकर जमिनीवरील भूसंपादनाचे शिक्के येत्या 21 दिवसात काढण्यात येणार असल्याचा निर्णय उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत जाहीर केला आहे.

पाबळ (ता. शिरुर) सह खेड तालुक्यातील पूर, वरुडे वाफगाव या गावातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची शिरुर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळाराव पाटील यांच्या पुढाकाराने उद्योग मंत्र्यांच्या समवेत मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, शिरूर आंबेगावचे तालुकाप्रमुख अरुण गिरे, सुनील बाणखीले, खेड उपतालुकाप्रमुख संतोष गार्डी, बैलगाडा संघटनेचे बाळासाहेब जवळेकर, वाफगावचे सरपंच उमेश रामाणे, नितीन कराळे, वरुडेचे सरपंच मारुती थिटे, पाबळचे ग्रामपंचायत सदस्य सचिन वाबळे, विठ्ठल तांबे, मुरली जाधव, गोसासीचे सरपंच संतोष गोर्डे, बापू दौंडकर, युवा सेनेचे बापू शिंदे, विशाल पोतले, सतीश फुटाणे, बाळासाहेब माशेरे, पोपटराव गोडसे यांसह आदी उपस्थित होते.

सेझच्या पहिल्या टप्प्यामध्ये कनेरसर, निमगाव दावडी, गोसासी गावातील सुमारे पाच हजार एकर जमिन संपादित करण्यात आलेली असून या ठिकाणी कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. तर या नंतरची केआईपीएल या कंपनीने सेझ च्या दुसऱ्या टप्प्यातील जमीन घेण्यासाठी नकार दर्शविला होता. यानंतर सुमारे पंधरा वर्षापासून या चार गावातील शेतकरी जमिनीवरील शिक्के काढण्याची मागणी सातत्याने राज्य शासनाकडे करत होते. यानंतर समितीने देखील राज्य शासनाला शिक्के काढण्या बाबतचा सकारात्मक अहवाल दिला होता.

मात्र राजपत्रत निर्णय प्रसिद्ध होण्या अभावी हा निर्णय कित्येक वर्षापासून थांबलेला होता. अखेर उद्योग मंत्री सामंत यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत एईझेडचे शिक्के काढण्याचा निर्णय घेतला. तर शेतकऱ्यांचा अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात यश आले असून जातिने लक्ष घालून सर्व प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी दिली.