रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील खंडाळे तसेच रांजणगाव परिसरात ठिबक सिंचन साहित्य चोरीचा प्रकार घडला होता. या प्रकरणाला आता नवे वळण लागले असून या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातून मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचन साहित्य चोरीला गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. याबाबत संबंधित तक्रारदारांनी सुमारे आठवडाभरापूर्वी रांजणगाव पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता.

मात्र, काही दिवसांनंतर तक्रारदारांनाच संशयित व्यक्तींबाबत अंदाज आल्याचे समोर येताच या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असुन काही तक्रारदारांनी संगनमत करुन आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा परिसरात सुरु झाली आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवरही मदत घेण्याचा दुर्दैवी प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काही निष्पाप तक्रारदारांना शांत राहावे लागल्याचीही माहिती समोर येत आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी झाल्यानंतरही तक्रार दाखल होऊन आठ दिवस उलटून गेले तरी प्रशासनाने ठोस कारवाई का केली नाही…? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून प्रशासन व नागरिकांमधील समन्वयाचा अभाव स्पष्ट होत असल्याची टीकाही होत आहे.

दरम्यान, या प्रकरणात काही प्रसारमाध्यमांचा वापर करण्यात आल्याचीही चर्चा असून, सुरुवातीला शेतकऱ्यांची बाजू मांडत बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र पुढे काही तक्रारदार आणि आरोपी यांच्यातील हितसंबंध समोर आल्याने यातील काही तक्रारदारांनी माघार घेतल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणावर विविध स्तरांतून टिकेची झोड उठू लागली आहे.
त्यामुळे उशिरा का होईना, पण या प्रकरणातील खरी वस्तुस्थिती समोर आणून दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा व संबंधित आरोपींना अटक करुन कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक व शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
(क्रमश:)