सिंगापूरला लाजवणारे आमचे शिरुर…शिरुर शहरातील अंतर्गत रस्त्याबाबत फेसबुकवरची पोस्ट होतेय व्हायरल

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असुन अनेकवेळा या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत असतात. शिरुर शहरातील रस्त्यावर घसरुन डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच शिरुर रामलिंग रोडवर नुकताच दोन जणांचा अपघाती मृत्यू झाला. तसेच बायपास ते शिरुर रस्त्यावर करडे येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल घायतडक यांच्या चारचाकी गाडीचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे टायर फुटला असुन चुकून जर ते दुचाकीवर असते तर काय झालं असत याचा विचारचं न केलेला बरा… एवढ्या गंभीर घटना होऊनही प्रशासनाला जाग आलेली नाही.

 

शिरुर शहरातील काही अंतर्गत रस्ते हे नगरपालिकेच्या अखत्यारीत येत असुन काही रस्ते हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येत आहेत. परंतु या दोन्ही खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था झाली असुन शिरुर रामलिंग रस्त्यावर 15 दिवसापुर्वी एका कॉलेज तरुणीचा रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मृत्यू झाला आहे. तसेच शिरुर मधील अंतर्गत रस्त्यावर असलेल्या मोठया खड्ड्यामुळे अनेकवेळा किरकोळ अपघात होत आहेत. याबाबत काही दिवसांपुर्वी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी शिरुर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शिरुर नगरपालिका यांना याबाबत निवेदन दिले होते.

 

नुकताच दोन दिवसांपुर्वी शिरुर बायपास रस्त्यावर करडे येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल घायतडक यांच्या चारचाकी गाडीचा टायर फुटल्याने त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर उपहासात्मक पोस्ट करत प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत.

 

अमोल घायतडक यांनी सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट 

 

सिंगापूरला लाजवणारे आमचे शिरुर…

 

हिरोईनच्या गालाला लाजवणारे आणि थेट चंद्रावरून दिसतील असे आमच्या शिरुरमधील फक्त गुडघ्याइतके खोल सुंदर व देखणे असलेले खड्डे…

 

शो च्या झाडांना टँकरने पाणी घालण्यासोबतच शिरुर नगरपालिकेने पाषाणमळा ते पाबळ फाटा या अंदाजे १ किलोमीटरच्या रस्त्यावर पडलेल्या ५०/१०० गुडघ्याइतक्या खड्ड्यांना थोडे फार डांबर लांबून दाखवले तरी जनता त्यांना दिवाळी गोड जाईल इतके आशीर्वाद देतील….

 

मी तर म्हणतो, थोडंफार डांबर लांबून नुसतं शिंपडले तरी दिवाळीपुरता खड्ड्यांचा मेकअप होईल, नगरपालिकेने तेवढं केलं तरी तुमच्या कातड्याचे जोडे आम्हाला शिवले तरी उपकार फिटायचे नाहीत…

 

तसेही शेकडो खड्डे असताना सुद्धा स्पीडब्रेकर्स टाकल्याने तुमची जनता रोजच आठवण काढत आहेच, प्रशासक साहेब..!!!

 

पेपरात बातम्या वगैरे आल्या तर कधीतरी वर्षभरातून खड्ड्यांच्या तोंडाला छटाकभर डांबर फासले जाते, ज्याच्या नावाखाली वर्षभर सहज काढते नगरपालिका….

 

या दिवाळीच्या आधी खड्ड्यांना डांबराचा नैवेद्य दाखवला तर मी स्वत: माझ्या घरी बनवलेला दिवाळीचा फराळ प्रशासक साहेबांना नेऊन देणार आहे…

 

आपल्याच धडाकेबाज कामांचा मोठा पंखा असलेला पन सध्या आपल्या लाडक्या खड्ड्यांमुळे गाडीचा टायर फुटल्याने बापाच्या शिव्या खाणारा आपल्याच सिंगापूरमधला एक सर्वसामान्य नागरिक…

 

याबाबत शिरुर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, काही दिवसांपुर्वी आम्ही अंतर्गत रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी डांबर उपलब्ध नसल्याने खडी आणि सिमेंटचा वापर केला होता. परंतु याबाबत काही नागरिकांनी तक्रारी केल्याने आम्ही काम बंद केले. सध्या आम्ही हे खड्डे बुजविन्याचे टेंडर काढले असुन दिवाळीपुर्वी डांबर टाकुन अंतर्गत रस्त्याचे खड्डे बुजविण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

 

खड्याबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणार…

अमोल घायतडक हे शिरुर तालुक्यातील करडे या गावचे रहिवाशी असुन तालुक्यातील अनेक सामाजिक विषयावर ते वेळोवेळी सोशल मीडियावर सडेतोड लिखाण करुन आवाज उठवत असतात. करडे-कारेगाव रस्त्यावर पडलेले 2048 छोटे मोठे खड्डे असोत किंवा न्हावरे फाटा ते चौफुला रस्त्याच्या रुंदीकरणासाठी नियमांची पायमल्ली करत झालेली वृक्षतोड असो, तसेच शिरुर शहरातील अंतर्गत रस्त्यावर पडलेले खड्डे असोत त्यांचे सोशल मीडियावर लिखाण व पाठपुरावा नेहमी चालूच असतो.