शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीने माल विक्रीची वेळ बदलल्याने शेतकरी आक्रमक

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक संस्था निर्माण केल्या. त्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कृषी बाजार समितीचा समावेश केला. तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला शेतीमाल सुलभतेने आणि चांगल्या किमतीत विकला जावा अशी त्या मागची भावना होती. मात्र शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या उलट चित्र असुन
गेल्या काही दिवसापासून बाजार समितीत भरणाऱ्या शेतमाल बाजाराच्या वेळेच्या संदर्भात वाद सुरु आहे.

सायंकाळी सहा वाजता भरणारा शेतीमालाचा बाजार अचानकपणे बाजार समितीने पहाटे चार वाजता सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असुन शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे धोरण नेमके काय आहे हेच सर्वसामान्य शेतकऱ्यांना कळेनासे झाले आहे. शिरूर शहरात असणारी शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती नेमकी शेतकऱ्यांची कि व्यापाऱ्यांची असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी एक निश्चित वेळ ठरविण्यात यावी यासाठी बुधवार (दि 16) रोजी दुपारी शिरुर- हवेलीचे आमदार अ‍ॅड अशोक पवार यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब कोरेकर, उपसभापती सतिश कोळपे, माजी सभापती शशिकांत दसगुडे व संचालक आणि शिरुर, श्रीगोंदा व पारनेर येथील काही शेतकरी उपस्थित होते. यावेळी काही शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीची वेळ हि पहाटे 4 वाजताची असावी तर काही शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीची वेळ हि सायंकाळी 6 वाजताची असावी अशी भूमिका मांडली. परंतु बहुतांश शेतकऱ्यांनी सायंकाळी 6 चीच वेळ सोयीची असल्याची भूमिका मांडली.

यावेळी शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळेस येणाऱ्या अडचणींचा पाढाच आमदारांसमोर वाचून दाखवला आणि सायंकाळी 6 चीच वेळ शेतकऱ्यांच्या दृष्टीने कशी सोयीस्कर आहे. हे पटवून दिले. परंतु शेतकऱ्यांमधेच वेळेबाबत दोन वेगवेगळे मतप्रवाह असल्याने आमदार पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांची मते विचारात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी भुमिका मांडली. परंतु शनिवार (दि 19) रोजी याच पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीने सभापती आणि सचिव यांच्या सहीने सूचनापत्रक काढत शेतकऱ्यांच्या माल विक्रीची वेळ सोमवार ते गुरवार संध्याकाळी 8:30 तर शनिवार ते रविवार पहाटे 4 असा निर्णय लागु केला. मात्र या निर्णया विरोधात शेतकरी आक्रमक झाले असुन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तसेच संध्याकाळी 8:30 वाजता शेतकरी बाजार केल्याने बाजार समितीतील सर्व दुकाने बंद झाल्यानंतर हि वेळ असल्याने कोणाच्या हितासाठी हा निर्णय घेतला गेला हे स्पष्ट होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असुन प्रत्यक्षात वेळ बदलण्याची गरज नसताना बाजार समितीतील काही व्यापाऱ्यांना त्रास होतो म्हणून हा निर्णय घेतला जात असल्याची कुजबुज सुरु आहे. या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांनी शिरुर पोलिसांना निवेदन देत निषेध व्यक्त केला. तसेच शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांना विश्वासात नं घेता घेतलेला असल्याने तो रद्द करण्यात यावा अशी मागणी केली.

कृषी उत्पन्न बाजार समिती नेमकी कुणासाठी…?
सायंकाळी 6 वाजता शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणल्यास शेतकऱ्यांना फायदा तर स्थानिक नागरिकांना चांगला शेतमाल योग्य भावात मिळत होता. अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आलेला असताना केवळ काही व्यापाऱ्यांना खूष करण्यासाठी आणि त्यांना त्रास नको म्हणून शेतकऱ्यांचा विचार न करता हा निर्णय घेतला. शेतात उन्हा-तान्हात दिवसभर काबाड-कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत पहाटे चारची वेळ चुकीची असतानाही ठराविक व्यापाऱ्यांना खुश ठेवण्यासाठी हा निर्णय कोण्याच्या इशारावर घेतला गेला हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यकाराची गरज नाही. केवळ व्यापाऱ्यांचे हित जोपासण्यासाठी पहाटे पुण्याचे व्यापारी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला बाजार मिळेल असे काही जण सांगत असले तरी इथेही व्यापाऱ्यांचे हित पाहिले जात आहे. गेल्या काही वर्षीपासुन बाजार समिती घेत असलेले निर्णय पाहता बाजार समिती शेतकऱ्यांची आहे कि व्यापाऱ्यांची असा प्रश्न सर्वसामान्य शेतकरीविचारत असुन याबाबत शासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे.