पुणे ग्रामीण ATS ची धडक कारवाई; ‘पुष्पा’ स्टाईल चंदन तस्करीचे पुणे कनेक्शन उघड, २८ लाख रुपयांचा चंदनसाठा जप्त

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुरंदर तालुक्यात मोठी कारवाई करत तब्बल २८ लाख रुपयांचा चंदनसाठा जप्त केला आहे. मांडकी (ता. पुरंदर) येथील पाटील वस्ती परिसरात शेतात लपवून ठेवलेले ५६० किलो वजनाचे चंदनाचे ओंडके पोलिसांनी हस्तगत केले असून, या कारवाईमुळे पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या चंदन तस्करीच्या रॅकेटची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. सोमवार (दि १८) मे रोजी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार पुणे ग्रामीण एटीएसचे पथक जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत संशयित आरोपींचा शोध घेत होते. 

दरम्यान, वाल्हे परिसरात पथकाला एका खबऱ्यामार्फत मांडकी येथील शेतात मोठ्या प्रमाणात चोरीचे चंदन लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएस आणि जेजुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत विलास रावजी भोसले यांच्या शेतात छापा टाकला. शेतामध्ये हिरव्या कापडाखाली लपवून ठेवलेले चंदनाचे मोठे ओंडके पोलिसांना आढळून आले. या सोबतच झाडे कापण्यासाठी वापरण्यात येणारा बॅटरीवर चालणारा कटर आणि दोन लोखंडी ड्रिलही जप्त करण्यात आले. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची एकुण किंमत तब्बल २८ लाख ५ हजार २०० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे.

भाच्याने ठेवला चंदनसाठा; आरोपी फरार

शेतीमालक विलास भोसले यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, हा चंदनसाठा त्यांचा भाचा प्रतिक प्रमोद खुंटे (रा. मांडकी, ता. पुरंदर, जि. पुणे) याने ठेवला असल्याचे समोर आले. मात्र पोलिसांनी शोध घेतला असता आरोपी पसार झालेला आढळला.या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि भारतीय वन अधिनियम तसेच महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम मधील कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी प्रतिक खुंटे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सातारा जिल्ह्यात जबरी चोरीसह गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पुण्यातही “पुष्पा” गँग सक्रिय…?

दक्षिण भारतातील चंदन तस्करीवर आधारित Pushpa: The Rise चित्रपट देशभर गाजला होता. मात्र आता पुणे जिल्ह्यातही काही “पुष्पा” स्टाईल टोळ्या सक्रिय असल्याची चर्चा या कारवाईनंतर सुरु झाली आहे. पुरंदरातील कारवाई हि केवळ हिमनगाचे टोक असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. जिल्ह्यातील विविध भागात चंदन चोरी, जंगल परिसरातील बेकायदेशीर वृक्षतोड आणि बाहेरील राज्यांमध्ये चंदनाची तस्करी करणारे नेटवर्क सक्रिय असल्याची शक्यता तपासली जात आहे.

मध्य प्रदेश दरोडा कटात, पुणे कनेक्शन…

या कारवाईमुळे सुमारे तीन महिन्यांपूर्वी घडलेली एक धक्कादायक घटना पुन्हा चर्चेत आली आहे. दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला परिसरातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार रमेश करडे याने, यवत येथील आर्म ॲक्ट प्रकरणातील आरोपी फिरोज सय्यद याला सोबत घेऊन मध्य प्रदेशातील चंदन तेल कारखान्यावर दरोडा टाकण्याचा कट रचल्याची माहिती समोर आली होती. सुत्रांच्या माहितीनुसार, दोघांनी पिस्टलचा धाक दाखवत चोरीचा प्रयत्न केला होता. मात्र मध्य प्रदेश पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडून दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. या घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील काही गुन्हेगारांचे चंदन तस्करीच्या आंतरराज्य रॅकेटशी संबंध असल्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

पोलिसांसमोर मोठे आव्हान

पुरंदरातील कारवाईनंतर आता पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे या तस्करीमागील संपूर्ण साखळी उघड करणे. चंदन नेमके कुठून आणले गेले…? त्याची विक्री कुठे होणार होती…? या रॅकेटमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत? याचा तपास आता वेगाने सुरु आहे. ग्रामीण भागातील शेत, गोदामे आणि जंगललगतच्या भागांचा वापर करून चंदनसाठा लपवला जात असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात अशा कारवायांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हि कारवाई पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे आणि एटीएसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, विशाल गव्हाणे, पोलीस हवालदार निलेश कदम, रविंद्र जाधव, पोलीस अंमलदार मोसीन शेख, ओंकार शिंदे, जालिंदर मुळीक तसेच जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक केशव जगताप यांचा समावेश होता. 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत