शिरुर तालुक्यात बैलगाडा दरम्यान बैलाचे शिंग छातीत घुसल्याने युवकाचा जागीच मृत्यू

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरूर) गावचे हद्दीमध्ये तळेगाव ढमढेरे गावच्या यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या बैलगाडा शर्यत दरम्यान बैलाचे शिंग छातीत घुसल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली असून वृषाल बाळासाहेब राऊत असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.

कासारी (ता. शिरुर) व तळेगाव ढमढेरे गावच्या सीमेवर असलेल्या बैलगाडा घाट या ठिकाणी तळेगाव ढमढेरे व कासारी गावातील बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते. सदर ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले असताना वृषाल राऊत हा देखील त्याच्या कुटुंबीयांसह बैलगाडा शर्यतीसाठी आलेला होता. यावेळी बैलांनी केलेल्या हालचाली दरम्यान बैलाचे शिंग हे वृषाल याच्या छातीत घुसले, पुणे मध्ये बैलाचे शिंग हे विशालच्या छातीत खोलवर घुसल्याने गंभीर दुखापत होऊन यावेळी वृषाल बाळासाहेब राऊत (वय ३५) सध्या रा. धायरी पुणे, मूळ रा. राऊतवाडी शिक्रापूर (ता. शिरूर) जि. पुणे याचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत योगेश अरुण राऊत (वय ३६) रा. राऊतवाडी शिक्रापूर (ता. शिरूर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून याबाबत पोलीस नाईक रोहिदास पारखे व राहुल वाघमोडे यांनी प्राथमिक तपास करत मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार अमोल चव्हाण हे करत आहे.