शिरूर भूमिअभिलेख कार्यालयाची उल्लेखनीय कामगिरी, विभागात तृतीय क्रमांक

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्य शासनाच्या “१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात” राज्यातील सर्व ३५८ तालुक्यांतील सुमारे १०,००० शासकीय कार्यालयांनी सहभाग घेतला. या उपक्रमाचे उद्दिष्ट होते शासकीय कार्यालयातील कार्यप्रणालीत पारदर्शकता, वेगवान सेवा वितरण, नागरिकाभिमुख दृष्टिकोन व नवोपक्रमांची अंमलबजावणी साधणे.

या कार्यक्रमाअंतर्गत शासनाने सर्व शासकीय विभागांच्या प्रत्येक महसुली विभागातील उत्कृष्ट तीन तालुका कार्यालयांची निवड केली. पुणे विभागातील एकूण २५ प्रशासकीय विभागांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. यामध्ये भूमिअभिलेख विभागाने विशेष उत्साहाने व गुणवत्तेने सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी बजावली.या कार्यामध्ये शिरूर तालुक्याच्या भूमिअभिलेख कार्यालयाने आपल्या ६५ स्पर्धक कार्यालयांमधून तृतीय क्रमांक मिळवत एक मानाचा मुजरा पटकावला आहे.

ही यशस्वी कामगिरी मिळवण्यासाठी शिरूर कार्यालयाने नागरिकांसाठी सेवा सुलभतेवर भर देत, डिजिटायझेशन, वेळेवर नोंद व नकाशा वितरण, स्वच्छता व कार्यसंस्कृती यामध्ये विशेष सुधारणा केल्या. या सर्व प्रयत्नांमुळे नागरिकांचा विश्वास जिंकत कार्यालयाने उल्लेखनीय प्रगती साधली आहे.”ही संपूर्ण शिरूर भूमी अभिलेखच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांची फलश्रुती आहे. त्यांच्या अथक मेहनतीला आणि सेवाभावी दृष्टिकोनाला सलाम,” असे मत उप अधीक्षक अमोल भोसले यांनी व्यक्त केले आहे.