शिक्रापुर (योगेश शेंडगे) महाराष्ट्रातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये ‘सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन’ ५ सप्टेंबर रोजी संस्थेत साजरा करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन शिरुर तालुका महानुभाव परिषदेच्या वतीने शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांना देण्यात आले.
यावेळी महंत दिवाकर बाबा अंकोळनेरकर (उपाध्यक्ष, पुणे जिल्हा महानुभाव परिषद ) महंत विजापूरकर बाबा (प्रचारमंत्री, पुणे जिल्हा महानुभाव परिषद), महंत बायराज बाबा जामोदेकर (कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा महानुभाव परिषद ) महंत दत्तराजबाबा सिन्नरकर ,माळवाडी कासारी (अध्यक्ष शिरुर तालुका महानुभाव परिषद ), महंत वाल्हेराज बाबा सिन्नरकर (शिरुर तालुका प्रचारमंत्री ), ई.श्री रवींद्रमुनी पंजाबी ,ई.श्री सुदर्शन दत्तराज सिन्नरकर पत्रकार संभाजी गोरडे यांसह पुणे जिल्ह्यातील संत महंत उपस्थित होते.
दरम्यान महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: GAD-49022/14/2023-GAD (DESK-29) दि.२७/१२/२०२३ नुसार भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिनाचा सन २०२४ मध्ये आयोजित करावयाच्या जयंती कार्यक्रमामध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील,जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करुन त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी असे या परिपत्रकात नमूद आहे.
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती…
आठशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात श्रीचक्रधरस्वामी हे अवतारी पुरुष होऊन गेले. त्यांनी महानुभाव पंथाच्या स्थापनेपासून प्रसार/प्रचाराबरोबरच अनेक सामाजिक कार्यही केले आहे. जसे स्त्रियांना, पददलितांना, गोर गरिबांना, सर्वसामान्यांना स्वतंत्रपणे धर्माचरणाचा, धर्मग्रंथांच्या अध्ययनाचा, समतेचा ईश्वरदत्त अधिकार होता. तो तत्कालिन रुढीवादी उच्चवर्गाने हिरावून घेतला होता. त्यांचा तो अधिकार श्रीचक्रधर स्वामींनी त्यांना परत मिळवून देण्याचे महान कार्य केले आहे.
कर्मकांडांच्या जोखडातुन सर्वसामान्यांची मुक्तता करण्यासाठी स्वामींना प्रतिगामी विचारांच्या विरोधात जनजागृती करावी लागली. त्यांचा विरोधही सहन करावा लागला. गुजरातमध्ये भडोच येथे अवतार घेतलेल्या स्वामींनी महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानली, गुर्जर भाषिक, तत्कालीन धर्मभाषा संस्कृत चांगल्या प्रकारे अवगत असूनही स्वामींनी महाराष्ट्रातील लोकांना समजेल अशा मराठीभाषेतून लोकांशी संवाद साधला, गोरगरीब, अनाथ, अपंग, आजारी यांची स्वतः सेवा करुन आपल्या अनुयायांनाही तसे करण्याची शिकवण दिली.
समाजाला दुर्व्यसन, हिंसा, अस्पृश्यता, वर्णव्यवस्थेपासून दूर राहण्याचा उपदेश केला. स्वामीनी आपल्या शिष्यांना प्राणिमात्रांना अभय द्यावे असे सांगितले. पर्यावरणाची काळजी घेण्यास प्रवृत्त केले. महाराष्ट्रातील झाडी गोंडवाडा (आजचे चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा जिल्हे) विदर्भ, खानदेश, गोदावरीच्या दोन्हीतीरा वरील ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वरपासून राहेर ,नांदेड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या प्रदेशात पायी परिभ्रमण करून अडाणी, अशिक्षित, आदिवासी समाजाचे प्रबोधन केले.
शिरुर शहरातुन दोन महिला बेपत्ता; पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल
शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
शिरूर तालुक्यात विद्युत रोहीत्र चोरीचे सत्र सुरूच