baby

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात रस्त्याच्या कडेला आढळली बेवारस चिमुकली…

मुख्य बातम्या

कोरेगाव भीमा (तेजस फडके): कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे माता तू न वैरिणी… असा अनुभव आला आहे. जन्मदात्या आईनेच सहा महिन्यांच्या मुलीचे अर्भक पुणे-नगर हायवेच्या बाजूला शंभर मीटरच्या आतमध्ये रस्त्याच्या बाजूलाच लाकडाच्या बॉक्समध्ये अर्भकाला टाकून देण्यात आल्याने कोरेगाव भीमा परिसरात खळबळ उडाली आहे.

फरची ओढा येथील गव्हाणे पाटील नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या जय मल्हार फॅब्रिकेशन समोर चिमुकलीला ठेवण्यात आले होते. अजय गव्हाणे व किरण गव्हाणे यांना चिमुकली दिसल्यानंतर त्यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व माहेर संस्थेच्या संस्थापिका ल्युसी कुरियन यांना कळवले. पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, महिला पोलिस नाईक अपेक्षा तावरे, पोलिस अंमलदार प्रताप कांबळे यांच्यासह १०८ अँब्युलन्स कर्मचारी व डॉक्टर पोळ तातडीने येत सहा महिन्यांच्या मुलीला ताब्यात घेतले. पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शिक्रापूर येथे मुलीला पोलिसांच्या निगरानित पाठवण्यात आले आहे.

किरण गव्हाणे,अजय गव्हाणे यांनी जपली माणुसकी…
चिमुकलीला टाकण्यात आलेल्या ठिकाणी माश्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. किरण गव्हाणे यांनी तब्बल पाऊण तास बाळा शेजारी बसून माश्या दूर केल्या यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. शंभू भक्त म्हणून ओळख असलेल्या किरण गव्हाणे यांच्या या माणुसकीला उपस्थितांनी शाबासकी दिली.