शिरुर; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश : म्होरक्यासह दोघांना अटक, ६ गुन्हे उघड

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील आंबळे गावात ६ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्याचा छडा लावत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरुर पोलीस स्टेशनच्या पथकाने आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीचा प्रमुख संजय तुकाराम गायकवाड (रा. जालना) आणि त्याचा साथीदार सागर सुरेश शिंदे (रा. मंठा, जालना) यांना अटक केली आहे. या कारवाईत दरोडा, जबरी चोरी व घरफोडीचे एकूण ६ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

दि ५ जुलै रोजी रात्री १ वाजता आंबळे (ता. शिरुर) येथील फिर्यादी कल्पना प्रताप निंबाळकर (वय ६०) यांच्या घरी पाच ते सहा चोरट्यांनी जबर मारहाण करत सुमारे १ लाख ६४ हजार किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लुटले. या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी विशेष तपासाच्या सुचना दिल्या होत्या.

स्थानीक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुमारे १५० किमीपर्यंत तवेरा गाडीचा माग घेत पाथर्डी परिसरात संशयित वाहन ओळखले. गुप्त माहितीच्या आधारे (दि ६) जुलै रोजी आरोपी संजय गायकवाड आणि सागर शिंदे यांना पुणे-अहमदनगर महामार्गावरुन ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असुन त्यांच्या अन्य ५ साथीदारांचा तपास सुरु आहे.

पोलिसांच्या तपासात शिरुर (पुणे ग्रामीण), अकोला (जुने शहर), शेवगाव (अहिल्यानगर), अकोला (जुने शहर), पारनेर (अहिल्यानगर), मालेगाव (वाशिम) या ठिकाणी चोरीचे गुन्हे केले असुन अटक केलेला संजय गायकवाड हा पुणे, जालना, संभाजीनगर, बीड, लातूर, नाशिक अशा विविध जिल्ह्यांत एकूण १३ गंभीर गुन्ह्यांत वॉन्टेड असून त्याच्यावर यापूर्वी MCOCA (मोक्का) अंतर्गतही कारवाई झालेली आहे. तो नुकताच जामिनावर सुटला होता.

हि कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा तसेच शिरुर पोलीस पथकाने केली आहे.

या सराईत टोळीचा बिमोड केल्याने नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत.

शिरूर तालुक्यात सरपंच आरक्षण सोडत: कुठे जल्लोष, कुठे निराशा!

शिरूरमध्ये ऑनलाईन सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

शिरूर तालुक्यात लंपी रोगाचा प्रकोप; शेतकऱ्यांचे जनावरे संकटात, भरपाई व तत्काळ उपचाराची मागणी तीव्र