रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २७) दुपारी एक भावनिक प्रसंग घडला. हरवलेल्या तीन वर्षांच्या चिमुकल्याला सुखरुपपणे त्याच्या आईच्या ताब्यात देताना पोलिस अधिकारी आणि महिला अंमलदार यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले.
रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत एका रिक्षावाल्याला तीन वर्षाचा मुलगा सापडला. पण त्याला कुठं राहतो, आई-वडील कोण याबाबत काहीही सांगता येईना. त्यामुळे सदर रिक्षावाल्याने ते बाळ थेट पोलिस स्टेशन मध्ये आणले आणि कृपया याचे आई-वडिलांचा शोध घ्या अशी विनंती केली.
याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे, २७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारच्या सुमारास शिरुर येथील रिक्षाचालक सद्दाम अकबर खान हे आपल्या सोबत सुमारे तीन वर्षांचा मुलगा घेऊन रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात आले. त्यांनी पोलिसांना सांगितले की, “हा मुलगा मला कारेगाव गाव हद्दीतील अहिल्यानगरजवळील पाटीलवाडा हॉटेलजवळ मिळाला. त्याला काही विचारले असता तो काही सांगु शकत नाही. त्यामुळे कृपया याच्या आई-वडिलांचा शोध घ्यावा अशी त्यांनी पोलिसांना विनंती केली. त्यानंतर पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पोलिस कर्मचारी वैजनाथ नागरगोजे, आकाश सवाने, संदीप भांड, योगेश गुंड आणि महिला अंमलदार शितल रौंधळ, पुजा नाणेकर यांनी दोन पथके तयार करत शोधमोहीम सुरु केली.
मुलाचे पालक शोधण्यासाठी सोशल मीडियाचाही वापर करण्यात आला. पोलिसांनी मुलाचा व्हिडिओ प्रसारित करुन नागरिकांना मदतीचे आवाहन केले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दिव्यभारती राम खिलारी (रा. कारेगाव, ता. शिरुर) या महिला पोलिस ठाण्यात आल्या व भावनिक स्वरात सांगितले, “हा माझा मुलगा मटरु राम खिलारी आहे. मी कामानिमित्त घराबाहेर गेले असता तो हरवला होता. सर्वत्र शोध घेतला पण सापडला नाही. सोशल मीडियावर व्हिडिओ पाहताच मी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली.” सदर महिलेची ओळख पटवुन पोलिसांनी चिमुकल्याला तिच्या स्वाधीन केले. आईला पाहताच मुलाच्या चेहऱ्यावर आनंद झळकला, पण पोलिसांनी केलेली माया पाहुन तो आईकडे जायला तयार नव्हता. त्या क्षणी महिला अंमलदारांच्या डोळ्यातही अश्रू दाटले.
दरम्यान, या प्रशंसनीय कामगिरीबद्दल रांजणगाव एमआयडीसी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी, आणि संवेदनशीलता यांचा सुंदर मिलाफ असलेल्या या घटनेने पुन्हा एकदा पोलिस यंत्रणेवरील विश्वास दृढ केला आहे.
शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत तलाठ्याची आरेरावीची भाषा; आत्ता जाग आली का…
रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २८ किलो गांजा जप्त; महिलेसह एक आरोपी अटक
रांजणगाव पोलिसांनी अपहरण झालेल्या तीन वर्षाच्या मुलाची केली पंजाबमधून सुटका
रांजणगाव MIDC त दिवसाढवळ्या ऑफिसमधुन ९० हजार रुपयांची टूल्सबॅगची चोरी
Video; रांजणगावमध्ये मोबाईल शॉपीमध्ये चोरीचा प्रयत्न अयशस्वी; गॅस एजन्सीत १५ हजारांची चोरी