शिरुर तहसिल कार्यालयाच्या सततच्या बंद लिप्टचे श्राद्ध घालून करणार ठिय्या आंदोलन

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसील कार्यालयातील तीन मजली इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर तहसील कार्यालयाशिवाय सेतू कार्यालय, पुरवठा विभाग, दुय्यम निबंधक, दुसऱ्या मजल्यावर सामाजिक वनीकरण, अभिलेख कक्ष,सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, कृषी विभाग, संजय गांधी निराधार, अपंग योजना तर तिसऱ्या मजल्यावर ऑनलाईन कामकाज, मिटींग, नागरीकांच्या विविध केसेस चालवल्या जातात. या तीनही मजल्यावर जाण्या येण्यासाठी असणारी लिप्ट (उद्वाहन )गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे या कार्यालयात विविध कामांसाठी वेगवेगळ्या विभागात तालुक्यातून विविध भागातून येणाऱ्या वयोवृद्ध, अपंग नागरिकांना कार्यालयात ये- जा करण्यासाठी नाहक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

काही अपंग बांधवांना कार्यालयात जाण्या -येण्यासाठी अक्षरशः उचलून न्यावे लागत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे आणि याबाबत वारंवार तक्रारी कनही सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग कडून याबाबत तत्परता दाखवली जात नाही. सदर बाबत वेळोवेळी सा.बां. विद्युत विभाग कनिष्ठ अभियंता कार्यकारी अभियंता पुणे तसेच शिरुर तहसीलदार आणि निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून आणि फोनच्या व्हाट्सअप च्या माध्यमातून वेळोवेळी तक्रार देऊनही सदर उद्वाहन बंद अवस्थेत आहे.

लिफ्टच्या तक्रारींसंदर्भांत शिरुर तहसिलदार आणी निवासी नायब तहसिलदार यांनीही याबाबत सा.बां.विद्युत विभागाशी संपर्क साधूनही सदर बाबत उपायोजना मात्र काही झाल्या नाहीत. गरजू नागरीकांची जाणीवपूर्वक हेळसांड सा.बां.विद्युत विभागाने व प्रशासनाने चालवल्याने शिरूर तालुक्यातील अपंग, वयोवृद्ध नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

शासनाचा एवढा पैसा खर्च होऊनही त्याचा जर गरजू नागरिकांना उपयोग होत नसेल, तर याचा उपयोग काय?? तसेच “महाराष्ट्र उद्वाहन कायदा १९३९ व महाराष्ट्र लिफ्ट नियम १९५८ प्रमाणे सदर उद्वाहनाची उभारणी व नियमण/देखभाल होत आहे का याबाबत चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज, संदिप शेळके यांनी केली आहे.

सरकारी काम अन् बारा महीने थांब या म्हणीचा शिरुर तहसिल कार्यालयात येतोय प्रत्यय…

शिरुर तहसिल कार्यालयात गेल्या अनेक महीन्यांपासून प्रभारी तहसिलदार असल्याने नागरीकांची कामे मोठ्या प्रमाणावर खोळंबली असून प्रभारी तहसिलदारांनी दुसरीकडे बदली होईपर्यंत दिवस ढकलणे सुरु ठेवले असून बऱ्याच दिवस ते कार्यालयातून गायबच असतात. दुसरे तहसिलदार आल्यावर तुमचे काम करुन घ्या, असे विधान ते करत आहे. असे पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांनी सांगितले आहे.

नागरीकांची ब्लॉक काढणे, गौण खनिजाचे निकाल, १५५च्या केसेस, नवीन शर्थ जमीन खरेदी विक्री परवानगी व इतर कामे गेले अनेक महीन्यांपासून होत नसल्याने सरकारी काम अन् बारा महीने थांब या म्हणीचा तंतोतंत प्रत्यय नागरीकांना येत असून नागरीक वारंवार हेलपाटे मारत असल्याचे पहावयास मिळत आहे.

पुढील सात दिवसांच्या आत सदर उद्वाहन चालू न झाल्यास व वारंवार येणाऱ्या याच्या समस्यांचा वरीष्ठ पातळीवरून निपटारा न झाल्यास जनहितास्तव (दि. १९) डिसेंबर पासून सदर “उद्वाहनाला हार घालून श्राद्ध व समोर बसून ठिय्या आंदोलन करणार आहे.

निलेश वाळुंज -सामाजिक कार्यकर्ते