शिरुर; भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांची अवैध धंद्यावरुन जुंपली, एकाचे पोलिसांवर आरोप तर दुसऱ्याकडुन पाठराखण

मुख्य बातम्या राजकीय

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात सध्या शिक्रापुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोठया प्रमाणात राजरोजपणे अवैध धंदे सुरु असल्याने भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव जयेश शिंदे यांनी शनिवार (दि 3) रोजी शिक्रापुर येथे पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले. तर भाजपाचे शिरुर बेट मंडलचे माजी अध्यक्ष सतिश पाचंगे यांनी जयेश शिंदे यांचे आरोप खोडून काढत पोलिसांची पाठराखण केली.

त्यामुळे भाजपाच्या दोन आजी माजी पदाधिकाऱ्यांमध्येच अवैध धंद्यावरुन जुगलबंदी पहायला मिळत आहे. पत्रकार परिषदे दरम्यान जयेश शिंदे यांनी सांगितले की, 19 एप्रिल 2023 रोजी मी शिक्रापुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे चालु असल्याबाबत पोलिसांना पत्र दिले होते. तसेच वेगवेगळ्या माध्यमातून अवैध धंदे बंद करण्याबाबत निरोपही पाठवले. परंतु तरीही शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे सुरुच असल्यामुळे मला पत्रकार परिषद घेऊन या चुकीच्या गोष्टीवर आवाज उठवणं गरजेचं वाटल्याच शिंदे यांनी सांगितले.

शिक्रापुर, रांजणगाव आणि शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत मोठया प्रमाणात दारु, जुगार, मटका, वेश्या व्यवसाय या प्रकारचे अवैध धंदे सुरु आहेत. यामुळे समाजातील तरुणपिढी वेगळ्या मार्गाने जात असुन त्यांचं आयुष्य उध्वस्त होत आहे. तसेच अनेक माता भगिनींचे प्रपंच उध्वस्त होत असताना कोणीतरी यावर ठाम भुमिका घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मी या अवैध धंद्याच्या विरोधात पुढाकार घेऊन आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत होणाऱ्या रोहीत्र चोरीच्या बाबतीत पोलिसांना सगळे पुरावे देऊनही कारवाई झाली नसल्याची खंतही शिंदे यांनी व्यक्त केली.

याला प्रत्युत्तर देताना शिरुर बेट मंडलचे माजी अध्यक्ष सतिश पाचंगे यांनी जयेश शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवत पोलिस कोणत्याच अवैध धंद्याना पाठिंबा देत नसल्याचे सांगत पोलिसांची पाठराखण केली. तसेच शिंदे यांना आपण किती पाण्यात आहात याचं आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. तुम्ही आधी कस वागता हे पहा मग पोलिसांवर आरोप करा अस सांगत तुम्हाला पोलिसांवर आरोप करण्याचा काय अधिकार आहे. तुम्ही कार्यकर्ता आहात त्यामुळे लोकांना मदत करता तर उपकार करत नाहीत अशीही टिका पाचंगे यांनी शिंदे यांच्यावर केली.

 

जयेश शिंदे यांचं वराती मागुन घोड…?

शिक्रापुर तसेच शिरुर तालुक्यातील अवैध धंद्याबाबत जयेश शिंदे यांनी शनिवार (दि 3) रोजी पत्रकार परिषद घेत शिक्रापुर पोलिसांसह रांजणगाव आणि शिरुर येथील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. परंतु  शिक्रापुर, रांजणगाव आणि शिरुर येथील पोलिस निरीक्षकांच्या नुकत्याच काही दिवसांपुर्वी बदल्या झाल्या आहेत. तसेच शिरुरचे उपविभागीय अधिकारी आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक यांचीही नुकतीच बदली झाली आहे. त्यामुळे ‘बैल गेला अन झोपा केला’ या म्हणीप्रमाणे शिंदे यांनी संबंधित पोलिस अधिकारी त्या पोलिस स्टेशनला असताना  त्यांच्या कार्यपद्धतीवर पत्रकार परिषद घेऊन आवाज का उठवला नाही. तसेच संबंधित पोलिस अधिकारी तालुक्यातुन बदलून गेल्यानंतर त्यांच्या कार्यपद्धतीवर टिका करणे म्हणजे ‘वराती मागुन घोड’ असाच काहीसा प्रकार असल्याचीही सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा आहे.