शिरुर (तेजस फडके) सध्या शेतीला प्रचंड मोठया प्रमाणात भांडवल लागते अशी एकीकडे परिस्थिती असतानाही दुसरीकडे कमी क्षेत्रातही योग्य नियोजन, संयम आणि तांत्रिक ज्ञानाच्या बळावर शेती भरघोस उत्पन्न देऊ शकते, हे शिरुर तालुक्यातील अण्णापुर येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब दत्तु रासकर यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करुन दाखवले आहे. अवघ्या १० गुंठे क्षेत्रात तब्बल ९ ते १० टन आल्याच्या पिकाचे उत्पादन घेत त्यांनी सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
भाऊसाहेब रासकर हे स्वतः कृषी सेवा केंद्र चालवतात. खत, बियाणे आणि औषधांचा सखोल अभ्यास असल्याने ते परिसरातील अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. त्याच अभ्यासाचा उपयोग करत त्यांनी स्वतःच्या शेतात प्रयोगात्मक पद्धतीने १० गुंठे जमिनीत आलं या पिकाची लागवड केली.
या १० गुंठ्यांत त्यांनी औरंगाबादी जातीच्या आल्याची लागवड केली होती. बाजारात आलेचे दर घसरले असतानाही घाई न करता, पीक सहा महिने अधिक काळ शेतातच ठेवण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. योग्य निगा, रोग नियंत्रण आणि व्यवस्थापनामुळे पीक उत्तम स्थितीत राहिले. परिणामी, सुमारे १८ महिन्यांत ९ ते १० टन उत्पादन हाती आले.
आलं पिकाला प्रति किलो २५ रुपये दर शेतातच मिळाला. काढणी, पॅकिंग व वाहतुकीचा संपुर्ण खर्च व्यापाऱ्यांनी उचलल्याने शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडला नाही. या पिकासाठी सुमारे ७० हजार रुपयांचा खर्च आला असुन, त्यातुन २ लाख ५० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे. “प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते,” या म्हणीप्रमाणे त्यांच्या यशात पत्नी ज्योती रासकर यांचेही मोलाचे योगदान आहे. आलं पिकाची लागवड, निगा आणि निर्णय प्रक्रियेत त्यांना पत्नीची साथ लाभल्याने ही यशोगाथा कुटुंबाच्या सामूहिक परिश्रमांचे उत्तम उदाहरण ठरले.
यावेळी बोलताना शेतकरी भाऊसाहेब रासकर म्हणाले, “योग्य जात निवड, संयम आणि बाजारभावाचा अभ्यास केला तर कमी क्षेत्रातही चांगले उत्पन्न मिळू शकते. घाई न करता पीक सांभाळले, तर शेती नक्कीच फायद्याची ठरते,”
स्वतः कृषी सेवा केंद्र चालवत असलेले अण्णापुर येथील शेतकरी भाऊसाहेब रासकर यांनी अवघ्या १० गुंठ्यांतून १० टन आलं उत्पादन घेऊन हे सिद्ध केले आहे की, योग्य तांत्रिक ज्ञान, नियोजन आणि संयम असेल तर कमी क्षेत्रातही शेती अत्यंत नफ्याची ठरु शकते. हि यशोगाथा परिसरातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
निलेश वाळुंज (सामाजिक कार्यकर्ता)