बिबट्याचा बंदोबस्त करा: शेखर पाचूंदकर यांची मागणी

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): शिरुर तालुक्यातील अनेक भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यात ऊस तोडणी झाल्यामुळे बिबट्याला आश्रयासाठी जागा उरली नसल्याने बिबट्याने त्याचा मोर्चा लोकवस्तीकडे वळविला आहे. शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, वासरांवर सातत्याने बिबट्या हल्ला करत आहे. आता त्याचा वावर लोकवस्तीकडे वाढल्याने माणसांवर देखील हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचूंदकर यांनी शिरुर तालुका वन अधिकारी मनोहर म्हसेकर यांची भेट घेऊन मागणी केली आहे.

unique international school
unique international school

खंडाळे, सोनेसांगवी, रांजणगाव गणपती, पिंपरी दुमाला, वाघाळे या भागात सातत्याने पाळीव प्राण्यांवर बिबट्या हल्ला करतो त्यामुळे स्थानिक नागरिक भयभीत अवस्थेत आहेत. रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना पिकांना पाणी द्यायला घराबाहेर पडायला भीती वाटते. कामगारांना रात्री उशीरा घरी जाताना रस्त्यावर बिबट्याचे दर्शन होते.

अनेकदा पिंजरे लावूनही बिबट्या पिंजऱ्याला हुलकावणी देत आहे. त्यामुळे या बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा त्याचबरोबर गावागावांतील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना बिबट्यापासून वाचण्यासाठी प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी वनाधिकारी मनोहर म्हसेकर यांच्याकडे शेखर पाचूंदकर यांनी केली.

दरम्यान म्हसेकर यांनी अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत यावर सातत्याने काम सुरु आहे. तरी देखील गावागावांत आपण शेतकरी आणि नागरिकांना लवकरच प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.