शिरुर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापकच करतील झेंडावंदन; गावागावातील वाद टळणार

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन (१५ऑगस्ट) आणि प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) या राष्ट्रीय सणांच्या दिवशी झेंडावंदन करण्याचा मान आता केवळ त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनाच राहणार आहे.

 

याबाबत शिरुरचे गटविकास अधिकारी महेश डोके यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शेतकरी तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ पाटील यांनी प्रत्येक गावात १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन) आणि २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) या दिवशी जिल्हा परिषद शाळेतील झेंडावंदन हे मुख्याध्यापकांच्या हस्ते केले जावे अशा आशयाचे निवेदन दिले होते.

 

त्यानंतर महेश डोके यांनी केंद्र व राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार या संदर्भात शिरुर तालुक्यातील सर्व शाळांना आदेश जारी केले असून, येत्या राष्ट्रीय सणापासून (१५ ऑगस्ट ) हा निर्णय प्रभावीपणे लागू होणार आहे. यापुर्वी झेंडावंदनाच्या अधिकारावरुन काही वेळा स्थानिक पातळीवर मोठे वाद निर्माण होत होते. मात्र, या आदेशामुळे आता ते वाद थांबून मुख्याध्यापकांना त्यांच्या हक्काचा मान मिळणार आहे.

 

त्यामुळे झेंडा वंदनावरून होणारे राजकारण व मतभेद आता थांबणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. राष्ट्रीय सणांच्या दिवशी शाळांमध्ये सन्मानपूर्वक आणि शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

 

शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी सर्व शाळांनी काटेकोरपणे करणे बंधनकारक आहे. “या संदर्भात काही त्रुटी आढळल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करण्यात येईल,” असा इशारा गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय सणांचा सन्मान, शिक्षकांचा गौरव आणि शाळेतील अनुशासन राखण्यासाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे, असे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

रांजणगाव MIDC मध्ये अवैध उत्खनन;पंचनामा प्रक्रियेत अनियमितता; महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह…?

शिरुर मधील दहा खाजगी शाळांचा भ्रष्टाचार; पालकांची लूट थांबवण्यासाठी आमरण उपोषण

Video; रांजणगावमध्ये मोबाईल शॉपीमध्ये चोरीचा प्रयत्न अयशस्वी; गॅस एजन्सीत १५ हजारांची चोरी