शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कामात दिरंगाई व कर्तव्यात हलगर्जीपणा होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांमधून होत असून आधिकारी निवासी राहत नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात अधिकारी दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची वरीष्ठ अधिकार्यांनी चौकशी करून तात्काळ बदली करून जबाबदार व कर्तव्यदक्ष अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी जोर धरु लागली आहे.या आरोग्य केंद्रांतर्गत तब्बल १२ गावे व ४ उपकेंद्रांचा समावेश आहे. पंचक्रोशीतील सर्वसामान्य रुग्ण औषधोपचारासाठी येथे येत असतात. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक असली तरी प्रत्यक्षात उपकेंद्राकडे अधिकारी फिरकत नसल्याने नागरिकांना आरोग्य सेवेसाठी वणवण करावी लागत आहे. विशेष म्हणजे, नियुक्त वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्राच्या निवासस्थानी न राहता ते शिरूर येथे राहतात. त्यामुळे ते सकाळी येऊन दुपारीच केंद्रातून निघून जातात. त्यामुळे रुग्णांना योग्य ऊचपार मिळत नाही.
स्थानिक कर्मचारी रुग्णांना वेळेवर उपलब्ध होतात, मात्र शिरूरमध्ये राहणारे अधिकारी नियमितपणे वेळेत उपलब्ध राहत नाहीत. परिणामी गरोदर महिलांसह, सर्पंदश, साथीचे आजार, हृदय विकाराचा झटका या रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात शिरूर किंवा मंचर. नारायणगाव येथे दूर जावे लागते. यामुळे वेळ, खर्च आणि मानसिक त्रास वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावण्याच्याही घटना घडल्या आहे. या भागामध्ये अपघातांची संख्या वाढली असून अपघातग्रस्त रुग्णांना सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे उपचार भेटत नाही.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून अशा अधिकाऱ्यांना तात्काळ तेथून हलवा अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे.
सध्या पावसाळ्यात साथीचे आजार वाढण्याचा धोका असताना आरोग्य केंद्राकडून अपेक्षित सेवा न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने तातडीने दखल घेऊन निवासी नसलेल्या व बेजबाबदार अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.