सणसवाडीत ‘श्रीदत्त पार्क’ नावाने बेकायदेशीर प्लॉटिंग करून रस्त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना देतायेत त्रास

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मौजे सणसवाडी येथील सर्वे/गट नं. ८ मध्ये अजित हिरामण दरेकर व नवनाथ विष्णू दरेकर (रा. सणसवाडी, पाटील मळा, ता. शिरूर, जि. पुणे) या दोघांनी तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून ‘श्रीदत्त पार्क’ या नावाने अवैध प्लॉटिंग सुरू केल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहीवाशी शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकरी व ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार –सदर प्लॉटिंग हे विनापरवाना व PMRDAच्या नियमांचे उल्लंघन करून करण्यात आलेले आहे. प्लॉटिंगसाठी कोणत्याही शासकीय अथवा प्रशासकीय संस्थेकडून परवानगी घेण्यात आलेली नाही.दरेकर बंधूंनी शेतीच्या नावाखाली घेतलेली जमीन प्रत्यक्षात आर्थिक फायद्यासाठी व बेकायदेशीर प्लॉटिंगसाठी वापरली आहे.

याठिकाणी कडूनिंबाच्या झाडांची परवानगीशिवाय तोड करून पर्यावरणाचे नुकसानही करण्यात आले असून त्याबाबतचा प्रस्ताव PMRDA वृक्ष विभागाकडे दाखल आहे. तेथील नागरिकांचा असा आरोप आहे की, संबंधितांनी दत्त मंदिराच्या वैयक्तिक मालमत्तेतून रस्त्याची मागणी केली असून, मंदिराच्या पावित्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न होत आहे. ग्रामस्थांनी मंदिराच्या सुरक्षेसाठी सर्वे नं. ७ च्या बांधावर सिमेंटचे पोल उभारले आहेत.

यासंदर्भात गट नं. १० चे शेतकरी मालकांनीही तहसीलदार व तालुका न्यायदंडाधिकारी, शिरूर येथे रस्त्याबाबत अर्ज दाखल केला असून सध्या न्यायप्रविष्ट सुनावणी सुरू आहे. मात्र, गट नं. ८ ला आधीपासूनच पश्चिमेकडून शेतीसाठी योग्य रस्ता उपलब्ध असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयात छायाचित्र पुरावे दाखल करून सदर बेकायदेशीर प्लॉटिंगविरोधात थेट तक्रार केली आहे. तलाठी व तहसीलदारांनी प्रत्यक्ष पाहणी करून नियमबाह्य प्लॉटिंगवर कारवाईचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप कारवाई झाली नाही.

दरेकर बंधू शासन व प्रशासनाची दिशाभूल करून विनाकारण तक्रारी दाखल करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा मानसिक व आर्थिक छळ होत आहे. शासनाचा मौल्यवान वेळ वाया जात आहे. म्हणूनच प्रशासनाने तात्काळ कडक कारवाई करून बेकायदेशीर प्लॉटिंग थांबवावे.” या प्रकरणामुळे सणसवाडी गावात मोठी चर्चा असून, शेतकरी विरुद्ध प्लॉटिंगधारक संघर्ष उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता तहसीलदार कार्यालयाकडून कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.