शिरूर तालुक्यातील त्या गावातील तहसिलदारांनी शेतकऱ्यांना दिलेला रस्ता नांगरला 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): उरळगाव (ता. शिरूर) येथील बेंद्रे वस्तीतील यादव कुटुंबीयांचा सातबारा व फेरफारवर नोंद असलेला पुर्वापार वहीवाटीचा रस्ता ट्रक्टरने नांगरून उखडून टाकण्यात आला असून यादव कुटुबियांना घरी जाण्यासाठीही रस्ता उपलब्ध नाही. या रस्त्यावरून वाद होत असल्यामुळे यादव कुटुंबाने तहसिलदार शिरूर यांच्याकडे दाद मागितली होती. तहसिलदार शिरूर यांनी सातबारा उताऱ्यावरील रस्त्याच्या नोंदीप्रमाणे सर्वांना समाईक रस्ता वापरण्याचा लेखी आदेश पारीत केला होता.

परंतु हाच रस्ता श्रीराम कुटुबीयाने ट्रक्टर लावून रस्ता नांगरून त्यावर सिमेंट डांब लावून तारा लावून रस्ता अडवला आहे त्यामुळे यादव कुटुबांना घरी व शेतात जाण्यासाठी त्यांना रस्ताच उरला नाही. त्यामुळे यादव कुटुंबाने शिरूर तहसीलदार व शिरूर पोलीस स्टेशन येथे याबाबत तक्रार दाखल केली आहे .या कुटुंबात १०५ वयाच्या आजी असून त्यांना दवाखान्यात उपचारासाठी नेता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर रस्ता खुला करून द्यावा अशी आग्रही मागणी यादव कुटुंबीयांकडून होत आहे.याबाबत शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याशी संपर्क असता ते म्हणाले की घटनास्थळी ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांना पाठवून पंचनामा करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

हा दिलेला रस्ता नांगरून, अडवून यादव कुटुंबीयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यांना घरी जा -ये करण्यासाठी तसेच शेतमाल बाहेर काढण्यासाठी कोणताही पर्याय राहीलेला नसून महसूल व पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्ता नांगरणाऱ्या व अडथळा निर्माण करणाऱ्यां विरोधात योग्य ती लवकरात लवकर कारवाई करावी व असे कृत्य करणाऱ्यांवर शिरूर तहसिलदार यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा असे मत शेतरस्ता चळवळीचे शिरूर तालुका समन्वयक शांताराम पानमंद यांनी व्यक्त केले आहे.