वृक्षतोड प्रकरणी शिरुरच्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना ५ हजार रुपयांचा दंड

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातील वडाच्या व इतर झाडांची बेकायदेशीररीत्या कत्तल करणारे गटविकास आधिकारी अजित देसाई व कर्मचारी यशवंत वाटमारे सह इतर सर्व दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच दोषी व्यक्तींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी. या मागणीकरीता नाथाभाऊ पाचर्णे यांनी (दि. ६) एप्रिल २०२३ सकाळी ११ वाजल्यापासून शिरूर नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.

दिवसभर आंदोलन सुरू असताना शहरातील अनेक पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वृक्षप्रेमी आणि शिरूर तालुक्यातील सुजाण नागरीकांना आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहून या राक्षसी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता. (दि. ६) रोजी संध्याकाळी ७:५० ला शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांनी नाथाभाऊ पाचर्णे आणि सहकाऱ्यांना आंदोलनस्थळी समक्ष भेट घेऊन पंचायत समिती द्वारे वृक्षतोड झालेली आहे. त्यामुळे त्यांना खुलासा करण्याचे लेखी पत्र दिले होते.

परंतु पंचायत समितीने दिलेला खुलासा अमान्य करत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजित देसाई यांना बेकायदेशीर वृक्षतोड केल्याप्रकरणी ८० देशी झाडे लावावी. आणि त्याचे संगोपन करून पुढील तीन वर्षांपर्यंत दर 6 महिन्याला त्याचा अहवाल नगरपरिषदेस सादर करावा. तसेच २० हजार रुपये अनामत रक्कम आणि ५ हजार रुपये दंड नगरपरिषदे कडे जमा करावे, असे लेखी आदेश देऊन नाथाभाऊ पाचर्णे आणि सर्व सहकाऱ्यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती केली.

मुख्याधिकारी यांच्या विनंतीवरून सर्व आंदोलनकर्त्यांच्या हस्ते नगरपरिषद परिसरात वटवृक्षाचे रोपन करून अनोख्या पद्धतीने आंदोलन स्थगित करण्यात आले. नगरपरीषदेने केलेल्या दंडाच्या घटनेमुळे वरिष्ठ पदावरील अधिकारी व्यक्ती जरी असेल तरी त्याला अपराध केल्यावर दंड आणि शिक्षा होऊ शकते असा संदेश या मधून समाजात जाईल अशी आशा आहे.

यावेळी इंडियन मेडिकल प्रोफेशन असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मगन ससाणे, बामसेफ चे राष्ट्रीय महासचिव प्राध्यापक गोरख वेताळ सर, प्रोटान चे सिद्धार्थ कांबळे सर, जनता दलाचे संजय बारवकर, भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटना जिल्हाध्यक्ष काशिनाथ पाचंगे, सामाजिक कार्यकर्ते सावळाराम आवारी, मगर तात्या, गणेश राक्षे, रामभाऊ इंगळे, काँग्रेस शिरूर तालुका सरचिटणीस फैझल पठाण, ताहीर भाई, भारत मुक्ती मोर्चा चे विजय भोइरकर, योगेश जामदार, अनिल शेळके, बाळासाहेब टोणगे, संदीप रूके, भरत घावटे, मनसेचे जनहित कक्षाचे रवी लेंडे, लहुजी शक्ति सेनेचे विशाल जोगदंड, आम आदमी पार्टी चे अनिल डांगे इतर उपस्थित होते. नाथाभाऊ पाचर्णे, युवराज भाऊ सोनार, फिरोजभाई सय्यद, सागर भाऊ घोलप, अशोक भाऊ गुळादे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.