शिक्रापूर परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

मुख्य बातम्या शिरूर तालुका

तीन महिन्यात अकरा विनयभंग तर चार बलात्काराचे गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सध्या महिलांवरील अत्याचार, विनयभंग तसेच बलात्काराच्या घटनेत वाढ होत असून 3 महिन्यास शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विनयभंगाचे 11 बलात्काराचे 4 गुन्हे दाखल झाले असून या पीडितांमध्ये अल्पवयीन युवतींची संख्या जास्त असल्याने महिला व युवतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या, मारामाऱ्या फसवणुकीचे अनेक गुन्हे घडत असताना महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण देखील सध्या वाढत चाललेले असताना महिलांवरील अन्यायांच्या घटनेत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत चाललेली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाढत्या नागरीकरण सह शाळकरी मुलींवर अत्याचारांच्या घटना सुद्धा वेगाने वाढत आहेत.

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही शाळकरी अल्पवयीन युवती अत्याचारातून गरोदर राहिल्याच्या घटना सुद्धा घडलेल्या असताना काही युवतींचा गर्भपात देखील करण्यात आलेला आहे, मागील महिन्यात शिरुर तालुक्यातील एका माजी सरपंचांने गावातील एका महिलेचा अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनकेदा शाळकरी मुलींचा विनयभंग झाल्यानंतर त्यांना शाळेतून घरी बसण्याची तर काही वेळा लग्नाच्या बेडीत अडकण्याची वेळ येत असल्याने शालेय शिक्षणाला मुकण्याची वेळ येत आहे.

कित्येकदा मुलींवर अत्याचार झाल्यानंतर बदनामी नको म्हणून कित्येकदा पालक तक्रार देण्यासाठी देखील पुढे येत असल्याच्या घटना घडत आहेत. मात्र सध्या शाळकरी तसेच अल्पवयीन युवती व महिलांवर होणाऱ्या विनयभंगासह अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशनचे निर्भया पथक कार्यरत; प्रमोद क्षीरसागर

शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून निर्भया पथकाची नेमणूक करुन त्यामध्ये स्वतंत्र महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सदर निर्भया पथक शाळा, महाविद्याल यांसह आदी ठिकाणी भेटी देत युवती व महिलांमध्ये जनजागृती करत आहे, तसेच अनेकदा साध्या वेशात महिला पोलीस कर्मचारी कित्येक ठिकाणी गस्त घालत असल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी सांगितले.

महिलांनी नियम पाळणे गरजेचे; सिमा पवार.

महिलांवरील अत्याचारसाठी स्वतंत्र कायदे असून त्या कायद्यांची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे सदर कायद्यांची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे असताना पुरुषांची मानसिकता बदलण्यासह महिलांनी करियर व संसारकडे लक्ष केंद्रित करुन स्वतः भोवती चौकोन आखून नियम पाळणे गरजेचे असल्याचे सिमाई महिला आधार फाउंडेशनच्या अध्यक्षा सिमा पवार यांनी सांगितले.