शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या निमोणे गावठाण हद्दीत अनधिकृतरीत्या गावठी दारूची विक्री सुरुचं असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गावठाण भागात उघडपणे सुरू असलेल्या या बेकायदेशीर धंद्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याची धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
गावठाणातच ‘दारुचे अड्डे’…?
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गावठाण हद्दीत काही ठराविक ठिकाणी रोजचं गावठी दारूची खुलेआम विक्री होत असून बाहेरगावाहून येणाऱ्या ग्राहकांचीही येथे वर्दळ आहे. गावातील मुख्य रस्त्यालगत आणि वस्त्यांजवळ सुरु असलेल्या या विक्रीमुळे महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मद्यधुंद अवस्थेतअसलेल्या दारुड्यासोबत होणारे वाद, शिवीगाळ आणि भांडणे यामुळे शांततेला तडा जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पोलिस आणि महसूल यंत्रणा कुठे?
शिरूर तालुक्यातील निमोणे हे महत्वाचे गाव आहे. या गावात जिल्हा बँक, स्टेट बँक, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडे बाजार, पोस्ट ऑफिस, महावितरणचे सबस्टेशन अशा महत्वाच्या गोष्टी असल्यामुळे आसपासच्या गावातील नागरिकांची या गावात मोठी वर्दळ असते. त्यामुळे गावठाण हद्दीतच असा उघडपणे बेकायदेशीर धंदा सुरु राहणे ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब असल्याची टीका होत आहे. शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडत असतानाही ठोस कारवाई होत नसल्याने अवैध धंद्यावाल्याना नक्की कोण पाठीशी घालतंय असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
नागरिकांच्या तक्रारीला केराची टोपली…?
गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वीही पुणे ग्रामीण अधिक्षक तसेच शिरुरच्या उपविभागीय अधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्याचे समजते; मात्र कारवाई फक्त कागदोपत्रीच राहिली असल्याचा आरोप आहे. अधूनमधून होणाऱ्या किरकोळ कारवायांनंतर काही दिवस शांतता आणि पुन्हा तोच धंदा सुरू, असा प्रकार सातत्याने घडत असल्याची चर्चा आहे.
गावातील तरुणाई धोक्यात…?
गावठी दारुच्या सहज उपलब्धतेमुळे अल्पवयीन मुलांपर्यंतही मद्य पोहोचत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्यसनाधीनतेमुळे कुटुंबात कलह, आर्थिक अडचणी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिलांनी या प्रकाराविरोधात ठाम भूमिका घेत ग्रामसभा बोलावून दारु विक्री न करण्याचा ठरावही घेतलेला आहे. तरीही गावठी दारुविक्री सुरुच असुन प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलावीत अशी मागणी महिलांनी केली आहे.
त्यामुळे निमोणे गावठाणातील अनधिकृत गावठी दारू विक्री तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त मोहीम राबवून संपूर्ण साखळी उध्वस्त करावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. आता प्रशासन जागे होणार का, की गावठाणातील हा ‘दारू व्यवसाय’ अशाच पद्धतीने सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मी सरपंचपदाचा भार स्विकारल्यानंतर गावात गावठी दारु विक्री करणाऱ्या सर्व व्यावसायिकांना दारु विक्री न करण्याबाबत कडक सूचना देत तस त्यांच्याकडुन लेखी घेतलं होत. पोलिसांनीही वारंवार त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई केलेली आहे. तरीही दारु विक्री चालूच असेल तर प्रशासनाने कठोर पाऊले उचलावीत. तसेच गावात पोलिस चौकी व्हावी हि आमची गेल्या अनेक वर्षांपासुनची मागणी आहे. पोलिस चौकी झाल्यास अवैध धंद्याना मोठ्या प्रमाणात आळा बसेल.
सारिका जाधव (माजी सरपंच)
प्रशासक, निमोणे
मी सरपंच असताना गावातील सगळे दारुधंदे बंद करण्याबाबत पुढाकार घेतला होता. अनेक तरुण दारुच्या आहारी जात असल्यामुळे त्यांचे संसार उध्वस्त होत आहेत. गावठाण हद्दीत सर्रास दारुधंदे चालत आहेत हि अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने याबाबत कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा वेळप्रसंगी आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल.
जिजाबाई दुर्गे
माजी सरपंच, निमोणे