रोहित्र फोडून तांब्याच्या तारांची चोरी; अनोसेवाडी अंधारात

शिरूर तालुका

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील अनोसेवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी विजेचे रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडाला असून शेतकऱ्यांचे पिकांना पाणी देण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे.

मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, शनिवार (दि 28) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी रोहित्राचे बाह्य आवरण फोडून आतमधील तांब्याच्या तारा आणि इतर साहित्य काढून नेण्यात आले. सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार आला तेव्हा रोहित्राची तोडफोड झालेली अवस्था पाहून संताप व्यक्त करण्यात आला.

हे रोहित्र निकामी झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. आधीच पाणीटंचाई व अनियमित वीज यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा प्रकार म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. ऊस, भाजीपाला आणि हंगामी पिकांना पाणी देणे थांबले असून पिके सुकून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ग्रामीण भागात दिवसा वीजेचे तास मर्यादित असताना अशा चोरीमुळे अनेक दिवस वीजपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. नवीन रोहित्र बसविणे, दुरुस्ती आणि तपासणी यासाठी किमान काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. या चोरीमुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) चे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही महिन्यांत शिरूर तालुक्यात अशा प्रकारच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांनंतरही रोहित्रांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत.

त्यामुळे तातडीने नवीन रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी अनोसेवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील रोहित्राच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या रोहित्र चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. आता तरी संबंधित यंत्रणा जागी होऊन ठोस कारवाई करणार का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.