निवडणुकीआधीच इच्छुक उमेदवारांमध्ये शक्तिप्रदर्शनाची स्पर्धा
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्याआधीच इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली असून, धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आडून खुलेआम राजकीय शक्तिप्रदर्शन सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
एका बाजूला ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाच्या नावाखाली मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, तर दुसऱ्या बाजूला जागरण–गोंधळ आणि जंगी भोजनाच्या माध्यमातून जनसमर्थनाची हवा निर्माण करण्याची धडपड सुरू असल्याने बेट भागात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
कवठे येमाई येथे एका इच्छुक जिल्हा परिषद सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराने पंचायत समिती सदस्य इच्छुक उमेदवारासह मोठ्या थाटात होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता दुसऱ्या जिल्हा परिषद पदासाठी इच्छुक इच्छुक उमेदवाराने टाकळी हाजी येथे भव्य जागरण–गोंधळ व सामूहिक भोजनाचे आयोजन करून शक्तिप्रदर्शना साठी नवी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे हे सर्व कार्यक्रम आचारसंहिता लागू होण्याआधीच जाणीवपूर्वक आखले जात असून, प्रशासनाची नजर चुकवून अप्रत्यक्ष प्रचार सुरू असल्याची चर्चा बेट भागातील ग्रामस्थांमध्ये रंगू लागली आहे. “ या वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे राजकीय प्रचार जोरदार रित्या सुरू असून त्याचा किती प्रभाव मतदानावर पडतो. हे आता येणारा काळच ठरवणार आहे.
आता या कार्यक्रमांना किती गर्दी जमणार, कोणत्या कार्यकर्त्यांची, राजकीय नेत्यांची उपस्थिती असते आणि त्यामागील राजकीय हेतू किती उघड होतो. याकडे आता संपूर्ण बेट भागातील जनतेचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकीपूर्वीच सुरू झालेली ही शक्तिप्रदर्शनाची लढाई पुढे किती चिघळते, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.