निवासस्थानी न राहणाऱ्या डॉक्टरच्या बदलीची केली मागणी
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रावर ‘आरोग्य’ नावालाच शिल्लक राहिले असून हे केंद्र अक्षरशः मृत्यूचं घर बनले आहे. वैद्यकीय अधिकारी नेमलेले असूनही एक अधिकारी सरकारी निवासस्थानात न राहता बाहेर मजेत मौजमजा करतात. सकाळी काही तास ‘हजेरी’ लावतात आणि दुपारी केंद्र सोडून निघून जातात. त्यामुळे १२ गावं आणि ४ उपकेंद्रांतील हजारो रुग्णांना वेळेवर उपचाराऐवजी थेट ‘मृत्यूची वाट’ पाहावी लागत आहे. याविरोधात बेट भागातील टाकळी हाजी, फाकटे, चांडोह, पिंपरखेड, काठापूर, माळवाडी, शरदवाडी, वडनेर, जांबूत, तब्बल नऊ ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी पुणे,जिल्हा परीषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना लेखी पत्राद्वारे निवेदन सादर केले आहे.
“सरकारी डॉक्टर अनुपस्थित असल्यामुळे आमच्या पेशंटला खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. वेळ, पैसा आणि जीव तिन्ही धोक्यात घालावे लागतात,” असा थेट संतापजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे.याहून धक्कादायक म्हणजे या आरोग्य केंद्रावर तक्रार वही व हालचाल रजिस्टरच उपलब्ध नाही. जबाबदारी झटकून फक्त पगार घेणारे हे अधिकारी रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप अधिक तीव्र होत आहे. एका डॉक्टरचे वडील मोठे अधिकारी असल्याने “वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव येतो, तसेच त्यांची कुणी बदली करू शकत नाही असे बोलले जात आहे. त्यामुळे वरीष्ठही कारवाई करत नाही” अशी खात्रीलायक माहितीही पुढे आली आहे.“अशा बेजबाबदार डॉक्टरांची बदली तात्काळ झालीच पाहिजे. अन्यथा आम्ही आरोग्य केंद्रावरच त्यांना प्रवेश नाकारू. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडू.या वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात बारा गावांच्या ग्रामपंचायतींनी एकमुखाने लेखी पत्रे दिली आहेत. “बदली तात्काळ झाली नाही तर दहा दिवसांत उपोषण!” असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
सरकारी डॉक्टर शिरूरमध्ये थाटात सुखासीन, आणि टाकळी हाजीचे नागरिक मात्र मृत्यूच्या दाराशी हे आम्हाला अजिबात मान्य नाही, असा संतप्त स्वर संपूर्ण पंचक्रोशीमध्ये घुमत आहे. एकुणच आता या प्रकरणी वरीष्ठ अधिकारी अशा कामचोर आधिकाऱ्यांवर दबाव झुगारून काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.