महाराष्ट्र शासनाच्या ‘मुद्रांक शुल्क अभय’ योजनेचा लाभ घ्या; अनिल जगताप

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शासनाने दि 1 जानेवारी 1980 ते दि 31डिसेंबर 2020 या कालावधीतील निष्पादित (सही केलेला) केलेले नोंदणीकृत व अनोंदणीकृत दस्तऐवजांसाठी मुद्रांक शुल्क व दंड सवलत अभय योजना जाहिर केली आहे. सदर योजनेचा संबंधित सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिरुरचे दुय्यम निबधंक अनिल जगताप यांनी केले आहे.

 

यामध्ये सर्व प्रकारचे दस्तऐवज खरेदीखत, विक्री करार, भाडेपट्टा, बक्षिसपत्र, गहाणखत, म्हाडा-सिडको-एसआरए-नगरपंचायत-नगरपरिषद-महानगरपालिका, यांच्याकडील अभिहस्तांतरणपत्र, पुनर्विकासाच्या अनुषंगाने करारनामा, विक्री करार, अभिहस्तांतरणपत्र, कंपन्यांच्या बाबतीत एकत्रीकरण- विलिनीकरण-विभाजन-व्यवस्था-पुनर्ररचना संबंतीत कोणताही दस्तऐवज, प्राधिकरणांकडील पहिले वाटपपत्र किंवा भाग प्रमाणपत्र अशा सर्व प्रकारच्या नोंदणीकृत व अनोंदणीकृत दस्तऐवजांचा समावेश आहे.

 

यासाठी संबंधितांनी विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सदर अर्जाचा नमुना विभागाचे www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर, दुय्यम निबंधक कार्यालयात व मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. तसेच पुर्ण भरलेले अर्ज दुय्यम निबंधक कार्यालयात व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात स्विकारले जाणार आहेत.

 

सदर योजनेमध्ये कालावधीचे 2 विभाग करण्यात आले आहेत.

1) कालावधी- दि. 1 जानेवारी 1980 ते दि. 31 डिसेंबर 2000.

अ) पहिला टप्पा- दि. 1 डिसेंबर 2023 ते दि. 31 जानेवारी 2024

या टप्प्यामध्ये 1 लाख रुपये पर्यंतच्या मुद्रांक शुल्काच्या रक्कमेमध्ये 100 टक्के माफी व त्यावर देय असलेल्या दंडाच्या रक्कमेमध्येही 100 टक्के माफी देण्यात आली आहे. तसेच रु. 1 लाखापेक्षा अधिक मुद्रांक शुल्काच्या रक्कमेमध्ये 50 टक्के माफी व त्यावर देय असलेल्या दंडाच्या रक्कमेमध्येही 100 टक्के माफी देण्यात आली आहे.

 

ब) दुसरा टप्पा- दि. 1 फेब्रुवारी 2024 ते दि. 31 मार्च 2024

या टप्प्यामध्ये रु. 1 लाख रुपये पर्यंतच्या मुद्रांक शुल्काच्या रक्कमेमध्ये 80 टक्के माफी व त्यावर देय असलेल्या दंडाच्या रक्कमेमध्येही 80 टक्के माफी देण्यात आली आहे. तसेच रु. 1 लाखापेक्षा अधिक मुद्रांक शुल्काच्या रक्कमेमध्ये 40 टक्के माफी व त्यावर देय असलेल्या दंडाच्या रक्कमेमध्येही 70 टक्के माफी देण्यात आली आहे.

 

2) कालावधी- दि. 1 जानेवारी 2001 ते दि. 31 डिसेंबर 2020

अ) पहिला टप्पा- दि. 1 डिसेंबर 2023 ते दि. 31 जानेवारी 2024 या टप्प्यामध्ये रु. 25 कोटी पर्यंतच्या मुद्रांक शुल्काच्या रक्कमेमध्ये 25 टक्के माफी व त्यावर देय असलेल्या दंडाच्या रक्कमेमध्ये दंड रक्कम 25 लाखापेक्षा कमी असेल तर 90 टक्के माफी व दंड रक्कम 25 लाख पेक्षा जास्त असेल तर दंड फक्त रु. 25 लाख व त्यापेक्षा अधिकचा दंड पुर्ण माफ तसेच रु. 25 कोटी पेक्षा अधिक मुद्रांक शुल्काच्या रक्कमेमध्ये 20 टक्के माफी व दंड रक्कम रु 1 कोटी व त्यापेक्षा अधिकचा दंड पुर्ण माफ

 

ब) दुसरा टप्पा- दि. 1 फेब्रुवारी 2024 ते दि. 31 मार्च 2024

या टप्प्यामध्ये रु. 25 कोटी पर्यंतच्या मुद्रांक शुल्काच्या रक्कमेमध्ये 20 टक्के माफी व त्यावर देय असलेल्या दंडाच्या रक्कमेमध्ये दंड रकम 50 लाखापेक्षा कमी असेल तर 80 टक्के माफी व दंड रक्कम 50 लाख पेक्षा जास्त असेल तर दंड फक्त रु. 50 लाख व त्यापेक्षा अधिकचा दंड पुर्ण माफ तसेच रु. 25 कोटी पेक्षा अधिक मुद्रांक शुल्काच्या रक्कमेमध्ये 10 टक्के माफी व दंड रक्कम रु 2 कोटी व त्यापेक्षा अधिकचा दंड पुर्ण माफ होणार आहे.