शिरुर तालुक्यात उडी मारताना पाय घसरल्याने पाण्याच्या प्रवाहात पडून तरुण बेपत्ता

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता.शिरुर) येथील माळीवस्ती परिसरातील ओढ्यात पाय घसरुन पाण्यात पडल्याने एक तरुण बेपत्ता झाल्याची घटना रविवारी (दि.२४) सकाळी १० वाजता घडली. ओढ्यातील खडकावरून दुसऱ्या बाजूला उडी मारत असताना तरुणाचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला अशी माहिती त्याच्या साथीदाराने दिल्याने स्थानिक ग्रामस्थांसह, पोलीस प्रशासन आणि फायर ब्रिगेडच्या पथंकाने दिवसभर शोधमोहीम राबविली.

 

मुळचा जळगाव जिल्ह्यातील राजेंद्र विक्रम कोळी हा २५ वर्षीय तरुण विजेचे खांब उभे करण्याचे काम करतो. आज दिवसभर कवठे येमाई परिसरात पाऊस सुरू असल्यामुळे काम बंद होते, त्याच्या एका साथीदारासह दोघे ओढ्याकडे आले होते. राजेंद्र उडी मारत असताना घसरुन पडल्याचे त्याच्या साथीदाराने सांगितले. जिथे तो पडला त्या ठिकाणी खडक असून तेथे खडकामध्ये रांजनाच्या आकाराचा मोठा खड्डा आहे. त्यामुळे तो खड्ड्यात अडकला की प्रवाहात वाहून गेला याचा अंदाज येत नसल्याने शोधकार्यात अडचणी आल्या.

 

या घटनेची माहिती समजताच पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ.सुभाष पोकळे, कवठे येमाईचे उपसरपंच उत्तम जाधव, रावडेवाडीचे सरपंच भाऊसाहेब किठे, गुलाब वागदरे, किसन हिलाळ, बाबू खाडे, टाकळी हाजी चे पोलीस मित्र विक्रम घोडे,संतोष घोडे आदी ग्रामस्थांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. निवासी नायब तहसिलदार स्नेहलता गिरीगोसावी यांनी घटनास्थळी भेट देत मंडल अधिकारी माधुरी बागले, कवठेच्या तलाठी ललिता वाघमारे, लहू सांडभोर, कोतवाल प्रशांत शिंदे यांना घटनास्थळी थांबून लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या.

 

टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले, पोलीस नाईक उमेश भगत, विष्णू दहिफळे, दिपक पवार, होमगार्ड हरीशचंद्र दंडवते, सनी शिंदे यांनी दिवसभर शोध घेण्याचा प्रयत्न केला. शोध कार्यास अडचणी आल्याने पुणे प्राधिकरणच्या फायर ब्रिगेडचे विशेष पथकास पाचारण करण्यात आले. उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते,मात्र अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.