आश्रमशाळेत स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थी घडवण्यासाठी शाळेचा अनोखा उपक्रम

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबविले जात असताना विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेची देखील तयारी करुन घेतली जात आहे.

मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात गेली दहा वर्षापासून संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक पलांडे, अध्यक्षा जयश्री पलांडे, सचिव सुरेश पलांडे व प्राचार्य तुकाराम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम राबविले जात असताना सामान्य ज्ञान परीक्षा यापैकी एक उपक्रम असून उपक्रमांतर्गत विविध विषयांशी संबंधित 50 गुणांची सामान्य ज्ञान परीक्षा प्रत्येक महिन्याचे शेवटी घेतली जाते.

माध्यमिक व ज्युनियर कॉलेज विभागासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका करत परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना योग्य ते बक्षीस देऊन गौरव करत वर्षाखेरीस 10 परीक्षांमध्ये प्रथम तीन क्रमांक काढून यातील विद्यार्थ्यांचा योग्य ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात येतो, या उपक्रमामुळे विद्यार्थी प्रेरित होऊन अभ्यास करु लागतात.

तसेच विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी ज्यावेळी बाहेर जातात. त्यावेळेस अशा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपलं भविष्य घडवत असतात. त्यामुळे सदर शाळेतून शिक्षण घेऊन गेलेले अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन आपलं आयुष्य आनंदाने जगताना दिसत आहे. सदर परीक्षा यशस्वी होण्यासाठी परीक्षा विभाग प्रमुख रुपाली नागवडे व अनिता डमरे विशेष परिश्रम घेत असल्याचे प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी सांगितले.