शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथे आज बुधवार (दि २१) रोजी सकाळी सातच्या सुमारास खंडोबा मंदिरासमोरील तलावाच्या कडेला एका २४ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करुन निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. महेंद्र लव सकट (वय २४) रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेचा शिक्रापुर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत छडा लावला असून एका आरोपीला अटक केली आहे तर दोन अल्पवयीन मुलांना तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
आज बुधवार (दि २१) रोजी सकाळी ७ च्या सुमारास कोंढापुरी गावच्या हद्दीतील खंडोबा मंदिरासमोरील तलावाच्या कडेला एका अनोळखी तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली. हि माहिती मिळताच यादव यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत
मृतदेहाची पाहणी केली असता तरुणाच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या अनेक जखमा आढळून आल्या त्यानंतर मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी दोन पथके रवाना केली. या तपासा दरम्यान मृत तरुणाची ओळख महेंद्र लव सकट अशी पटली. याप्रकरणी शिक्रापुर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन तपास पथके तयार करुन सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरु करण्यात आला या तपासात रांजणगाव गणपती परिसरातील तीन संशयितांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.दरम्यान संशयित आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यात पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांचे पथक त्या दिशेने रवाना झाले होते.
शिक्रापुर पोलिसांनी बेलापुर बायपास ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर येथे शोध घेतला असता तिन्ही संशयित मिळून आले आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता प्रथमेश नानासाहेब राऊत (रा. फंडवस्ती रांजणगाव गणपती ता. शिरुर; मुळ रा. ढोकसांगवी, ता. शिरुर) याच्यासह दोन अल्पवयीन मुलांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रथमेश राऊत याला अटक करण्यात आली असून दोन्ही अल्पवयीन मुलांना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मृत तरुण आरोपी आणि दोन्ही अल्पवयीन मुलं एकमेकांच्या परिचयातील होते त्यातील एका अल्पवयीन मुलाचे आणि मृत तरुणाचे कोणासोबत फिरायचे व कोणाशी बोलायचे यावरुन वाद होते. याच वादातून खुनाचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृत महेंद्र सकट याला गांजा पिण्याचे आमिष दाखवून निर्जनस्थळी नेण्यात आले तेथे दोन चाकूंनी त्याच्या शरीरावर १८ ते २० वेळा वार करुन त्याचा खून केल्याची माहिती तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ शुभम कुमार आणि शिरुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, जिनेश कोळी, अंकुश कारंडे तसेच पोलीस हवालदार अमोल दांडगे, रोहिदास पारखे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे, अमोल चव्हाण आणि पोलीस कॉन्स्टेबल राम जाधव, नारायण वाळके, मच्छिंद्र निचित यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी या तपासात सहभाग घेतला होता.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हनमंतराव गिरी पोलीस हवालदार नितीन सुद्रिक आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल गडदे हे करीत आहेत.