कोयता गँगच्या गुंडाला अद्दल घडविणाऱ्या त्या “सिंघम” पोलिसांचा बाप्पुसाहेब शिंदे कडुन सत्कार

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत आंबेगांव- बुद्रुक येथे सिंहगड रोडवर पाच दिवसांपुर्वी कोयता गँगच्या गुंडांने कोयता हातात घेऊन दहशत माजवली होती. त्याचवेळी अचानक पोलिसांनी सिनेस्टाईल एंट्री करत दहशत माजविणाऱ्या एका गुंडाला भर चौकात “पोलिसी खाक्या” दाखवत काठ्यांचा प्रसाद दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे सर्वच स्तरातून पोलिसांवर प्रचंड मोठया प्रमाणात कौतुकाचा वर्षाव झाला. यावेळी स्वतःचा जीव धोक्यात घालुन कोयता गँगच्या गुंडाला अद्दल घडविणाऱ्या त्या “सिंघम” पोलिस कर्मचाऱ्यांचा बाळासाहेबांची शिवसेनेचे युवा जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांनी पुण्यात जाऊन सत्कार केला आहे.

पुण्यात बुधवार (दि 28) रोजी सिंहगड कॅम्पस येथील लॉ कॉलेज समोरील परिसरात कोयता गँग कडून दहशत पाहायला मिळाली होती. कोयता गँगच्या गुंडानी हातामध्ये धारदार हत्यारे घेऊन परिसरात असणाऱ्या नागरिकांना धमकावत त्या परीसरात असणाऱ्या दुकानांवर हत्यारे मारत दहशत निर्माण केली होती. सिंहगड रोड परिसरात कोयत्याने दुकानांची मोडतोड करत दहशत निर्माण करणाऱ्यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. पुणे शहरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी या गुंडांना धडा शिकवणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांचा स्थानिक नागरिकांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात जाऊन सन्मान केला.

या गुंडाला चोपून काढणाऱ्या पोलिसांवर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत असुन या गुंडाना अद्दल घडविणाऱ्या “सिंघम” पोलिस कर्मचारी धनंजय पाटील, अक्षय इंगवले तसेच सहायक पोलिस निरीक्षक कादबाणे यांचा बाळासाहेबांची शिवसेनेचे युवा जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे बाळासाहेबांची शिवसेनेचे पुणे शहर विभाग प्रमुख शिवा पासलकर, अ‍ॅड बाळासाहेब शेळके, जितेंद्र पाटील यांनी सत्कार केला.