श्रीगोंदयातील दुध भेसळ प्रकरणी शिरुर कनेक्शन उघड

महाराष्ट्र मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): श्रीगोंद्यातील काष्टी येथील दुध भेसळीमध्ये पुणे जिल्हयातील शिरूरच्या कैलास बालाजी लाळगे सह जुन्नर तालुक्यातील उंब्रज येथील वैभव हांडे याला श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे.

दूध हे प्रत्येक सर्वसामान्यांच्या जीवनातील एक अत्यावश्यक व अविभाज्य घटक आहे. अगदी लहान बाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच दूध पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. तसेच अनेक खाण्याचे पदार्थ बनवण्यासाठी दुधाचा वापर सर्रास केला जातो. त्यामुळे सर्वच स्तरातून दुधाला मागणी वाढतच आहे.

दुधाची हीच मागणी आणि त्यात मिळणारा बक्कळ पैसा विचारात घेऊन काही स्वार्थी लबाड लांडग्यानी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांच्या , लहान मुलांच्या जीवाशी खेळत व्हे परमिट पावडर आणि लाईट लिक्विड, प्याराफिन या केमिकलं चा वापर करून कृत्रिम दूध मोठ्या प्रमाणावर तयार करून विक्री केली आहे. त्यांनी दुधात भेसळ करून बक्कळ पैसा कमावला असून हा पैसा कमावण्याच्या नादात ते लोकांशी जीवघेणा खेळ ते खेळत आहेत याचा मात्र त्यांना विसर पडलेला दिसत आहे.

हे प्रकरण फक्त भेसळीवर थांबलेले नाही तर आता ज्याच्याकडे गोठा नाही एकही दुधाचे जनावर नाही अश्या व्यक्ती सुद्धा व्हे परमिट पावडर आणि लाईट लिक्विड प्याराफिन या केमिकलं चा वापर करून कृत्रिम दूध तयार करत आहेत. या भेसळयुक्त दुधामुळे कॅन्सरसारखे आजार झपाट्याने वाढायला सुरुवात झाली आहे. आणि ही बाब दूध पिणाऱ्या लोकांच्या जीवावर बेतणार आहे.

दुधाच्या नावाखाली भेसळयुक्त विष विकणाऱ्यांना वेळीच आवरणे गरजेचे आहे. गावागावातील प्रत्येक डेअरीवर छापा टाकून अन्न व औषध प्रशासन विभागाने दुध घालणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांचे मस्टर चेक करून गोठ्यावर जाऊन चौकशी करुन किती लिटर दुध पुरवले जाते याची शहानिशा करणे गरजेचे आहे.

श्रीगोंदा पोलिस स्टेशनला दुध भेसळीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले व तपासी अधिकारी समीर अभंग यांनी तपासाची वेगवान चक्रे फिरवत पुणे व अहमदनगर या दोन जिल्ह्यातील जवळपास १७ भेसळखोरांचे नेटवर्क शोधण्यात यश मिळवले आहे. मुख्य आरोपी सापडल्यानंतर संपूर्ण राज्यातील दूध भेसळीचे नेटवर्क उघडकीस येणार आहे. यात मोठमोठ्या हस्ती गुंतण्याची शक्यता आहे.