साधे सोपे घरगुती उपाय

आरोग्य

आम्लपित्तावर आवळा फार गुणकारक आहे. आवळ्याच्या रसात जिरे आणि खडीसाखर घालून सकाळसंध्याकाळ दिवसातून दोन वेळा घ्यावा. आठपंधरा दिवसांत आम्लपित्त थांबते. ताजा आवळा नसताना पूडसुद्धा चालते.

आवळा भाजून खाल्ल्याने खोकलयास लगेच आराम पडतो.

अंगावर पित्त उठत असेल तर… कुटलेला ओवा आणि गूळ एकत्र करून तो आल्याच्या रसातून घेतल्यास हा विकार बरा होतो.

पोटातल्या उष्णतेवर धने उपयुक्त -फार तहान लागते किंवा पोटात उष्णता वाढते अशावेळी धने रात्री पाण्यात भिजत घालावेत. सकाळी ते पाणी गाळून घेऊन त्यात साखर टाकावी आणि दिवसातून ३- ४ वेळा घ्यावे.

क्षयरोगातल्या खोकल्यावर ज्येष्ठमधाचा फार उपयोग होतो. ज्येष्ठमधाचे वस्त्रगाळ चूर्ण त्यात निम्मे सितोपलादी चूर्ण मिसळून तूप आणि मधातून वारंवार चाटण केल्यास खोकला सुटून छाती हलकी होते.

अति घामाने शरीर थंड पडत असेल तर सुके खोबरे, लसूण आणि ओवा ही एकत्र वाटून त्याच्या गोळ्या करून खाव्यात. घाम यायाचा थांबतो आणि शरीर थंड पडत नाही.

तुळशीच्या पानांचा अंगरस आणि मध ही एकत्र करून प्रत्येक वेळी दोन चमचे प्रमाणे दिवसातून तीन वेळा काही दिवस नियमित घेतल्यास शरीरातील फाजील चरबीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

आवाज बसला तर हळदपूड आणि गूळ एकत्र करून त्याच्या लहान गोळ्या तयार कराव्यात आणि सकाळ-संध्याकाळ त्या गरम दुधाबरोबर घ्याव्यात.

पित्ताने डोके दुखत असल्यास – ५काळ्या मनुका रात्री अर्धा कप पाण्यात भिजत घालाव्या. सकाळी अनशापोटी ते पाणी प्यावे आणि भिजेलेल्या मनुका खाव्यात. डोंगरी आवळा ठेचून त्याचा रस कपाळाला लावावा. अर्धी वाटी गरम दुधात एक चमचा साखर, कामदुधा पाव चिंचोक्याएवढी घालावी. सकाळी व रात्री प्यावी. मोरावळा चमचाभर घेऊन त्यात कामदमुधा घालून त्यात सूतशेखर मात्रा मूगाच्या डाळी एवढी उगाळून सकाळी प्यावी.

दालचिनी थंड आहे, तोंड आल्यावर दालचि‍नीचा तुकडा तोंडात खडीसाखरेबरोबर धरतात. दालचिनीची पूड केळ्याबरोबर खाल्ल्यास अंगातली उष्णता कमी होते. चहाच्या मसाल्यात घालतात. पदार्थ रुचकर बनतो.

उन्हाळ्यात जर घाम जास्त येत असेल तर पाण्यात तुरटी घालून अंघोळ केली पाहिजे.

रात्री झोप नसेल लागत तर झोपताना पायांना सरसोच्या तेलाची मालीश करून झोपायला पाहिजे, लगेचच झोप येते.

एक कप गुलाब पाण्यात अर्ध लिंबाचे रस टाकून त्याचे सकाळ-संध्याकाळ चूळ भरल्याने तोंडातील दुर्गंधी दूर होऊन हिरड्या व दात मजबूत होतात.

जेवणात दर रोज दोन केळी घेतली तर भुकेत वाढ होते.

एक चमचा साजुक तुपात हिंग घालून प्यायलाने पोटदुखीत आराम मिळतो.

लिंबाच्या अर्ध्या फोडीवर साखर, अर्ध्या फोडीवर मीठ घालून निखार्या वर ठेवून गरम करावे. दोन्ही फोडी पिळून त्याचा रस चाटावा. डोकेदुखी, पित्त नाहीसे होते. पचनास चांगले म्हणून जेवणात दररोज घ्यावे.

कच्चे गाजर खाणे नेहमी फायदेशीर असते. गाजरामध्ये असलेल्या पिवळा भाग खाऊ नये, कारण ते अधिक उष्ण असल्याने ऍसिडिटीचा त्रास उद्भव असतो. गाजर गर्भवती महिलांसाठी गरम पडण्याची शक्यता असल्याने त्यांनी गाजर सेवन करु नये.

गाजर हृदयरोगावर अधिक लाभदायी असून रक्त शुद्ध करणे, वातदोषनाशक, पुष्टिवर्द्धक तसेच मेंदू व आतडे यांच्या दृष्टीने बलवर्धक आहे. मूळव्याध, पोटाचे विकार, मूतखडा आदी आजारांवर औषधी आहे.विटामीन ‘ए’ असल्याने नेत्र रोगावर लाभदायक आहे.

गाजरामध्ये कॅल्शियम व केरोटीन हे मुबलक प्रमाणात असल्याने लहान मुलांसाठी उत्तम आहार आहे. मुलांच्या पोटातील जंत नष्ट करण्यासाठी गाजर औषधी आहे.