चेहरा बघून आपल्याकडे चक्क भविष्यवाणी देखील केली जाते, हे फारच कॉमन आहे. इतकंच नाही तर चेहरा बघून आपण एखाद्याचा मूड कसा आहे याचा अंदाज देखील लावू शकतो. याचबरोबर, चेहऱ्यात होणारे सूक्ष्म बदल हे आपल्या आरोग्यासंबंधित वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देखील देतात. आपल्या चेहऱ्यामध्ये होणारे लहान – मोठे बदल आपण बरेचदा चुकीच्या स्किनकेअर रूटीनचा परिणाम किंवा ऋतूमानातील बदल मानून दुर्लक्ष करतो. अनेकदा आपल्या त्वचेचा रंग बदलतो, डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येतात, डोळ्यांना सूज येते असे अनेक बदल दिसतात, परंतु अनेकजणी या बदलांकडे कानाडोळा करून वेळ मारून नेतात
डार्क सर्कल्सपासून ओठांना भेगा पडण्यापर्यंत हे बदल तुमच्या शरीरातील पोषणाची कमतरता किंवा इतर आरोग्याच्या समस्यांचे संकेत देखील असू शकतात. आपल्या चेहऱ्यावर दिसणारे हे सहा बदल नेमके कोणते आहेत ते पाहूयात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला चेहऱ्यावर दिसणाऱ्या या संकेतांना ओळखता आलं, तर तुम्ही वेळेत तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता आणि योग्य ती काळजी घेऊन आरोग्यासंदर्भात गंभीर समस्या टाळू शकता.
चेहऱ्यात दिसतात हे ५ बदल
१) डार्क सर्कल्स: डोळ्यांखालील डार्क सर्कल्स केवळ कमी झोपेचे लक्षण नाही, तर शरीरातील आयर्नच्या कमतरतेचे (ॲनिमिया) देखील लक्षण असू शकते.
२) डोळ्यांना सूज येणे: सतत सूजलेले डोळे यकृत किंवा किडनीच्या कार्यातील अडथळ्यांचे मुख्य लक्षण असू शकते. तसेच शरीरातील अधिक मिठाचे प्रमाण किंवा पाणी टिकून राहण्याचा त्रास असण्याची शक्यता असते.
३) कोरडी त्वचा: त्वचेचा कोरडेपणा ओमेगा-३ फॅटी अॅसिड्सच्या कमतरतेमुळे किंवा डिहायड्रेशनमुळे होतो. तसेच थायरॉईडच्या असंतुलनाचेही ते लक्षण असू शकते.
४) ओठ फुटणे: सतत ओठ फुटणे हे शरीरातील व्हिटॅमिन ‘बी’, ‘झिंक’ यांसारख्या सूक्ष्म पोषकद्रव्यांच्या कमतरतेचे संकेत देतात.
५) दाह व पुरळ: चेहऱ्यावर वारंवार पुरळ येणे पचनसंस्थेशी संबंधित समस्या, हार्मोनल असंतुलन किंवा जास्त साखर व प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ अधिक प्रमाणांत खाण्याचे लक्षण असू शकते.
६) डोळे लालबुंद होणे: सतत वरचेवर डोळे लालबुंद होणे हे लिव्हर स्ट्रेस, मद्यपान किंवा डोळ्यांवरील ताण यांसारख्या समस्यांशी संबंधित असू शकते. त्यामुळे अशा लक्षणांची वारंवारता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
(सोशल मीडियावरून साभार)