कोणते पौष्टिक पदार्थ थेट न खाता – खावेत या पद्धतीने
१) पालक रस: पालक आपल्या नेहमीच्या जेवणात खातोच. पण काहीजण हेल्दी म्हणून पालकाच्या पानांचा रस देखील पितात. परंतु पालकाच्या पानांचा रस प्यायला तर ते तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे शोषून घेण्यापासून रोखतात, म्हणूनच कच्च्या पालकाच्या पानांचा थेट रस न पिता सर्वातआधी पालकांना हलकेच उकळवा आणि नंतर ते मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. यामुळे त्यांची पौष्टिक गुणवत्ता सुधारेल आणि त्यातील महत्वाची आवश्यक ती पोषक तत्वे शरीर सहजपणे शोषून घेईल. यामुळे जर तुम्हाला पालक खायचाच असेल तर तो अधिक उकडवून घ्यावा आणि मगच तो खावा.
२) कच्ची कडधान्य: कडधान्य पौष्टिक म्हणून जर तुम्ही ती कच्चीच खात असाल तर हे चुकीचे आहे. कच्ची कडधान्य वारंवार खाल्ल्यांस आपल्याला पचनासंबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कडधान्य खाताना त्यांना हलकेच वाफ देऊन ती उकडवून खावीत. यामुळे ही कडधान्य सहजपणे पचवणे सोपे जाते. परिणामी, पचनासंबंधिचे अनेक प्रॉब्लेम्स दूर होतात.
३) अॅप्पल सायडर व्हिनेगर: आजकाल भरपूर लोक अॅप्पल सायडर व्हिनेगर हेल्दी म्हणून पितात. वजन कमी करण्यासाठी अॅप्पल सायडर व्हिनेगर प्यायले जाते. परंतु जर तुम्ही ते थेट पीत असाल तर ते तुमच्या आतड्यांना हानी पोहोचवू शकते. एवढंच नाही तर दातांवरील एनॅमलच्या थराचे देखील नुकसान होऊ शकते. यासाठी अॅप्पल सायडर व्हिनेगर पिताना ते थेट न पिता पाण्यांत मिक्स करूनच प्यावे. त्याचबरोबर अॅप्पल सायडर व्हिनेगर पिताना स्ट्रॉचा वापर करावा यामुळे दातांचे संरक्षण होऊन आतड्यांवर देखील फायदेशीर परिणाम करेल.
४) भरड धान्यांची चपाती: आजकाल हेल्दी म्हणून किंवा वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भरड धान्यांपासून तयार करण्यात आलेली चपाती खाल्ली जाते. या भरड धान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या धान्यांचा समावेश होतो. परंतु या भरड धान्यांमध्ये ग्लूटेन आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे ही भरड धान्य पचनाला थोडी जड असतात, यामुळे आपल्याला गॅसेसचा त्रास देखील होऊ शकतो. यामुळे भरड धान्यांची चपाती खाताना नेहमी त्यावर तूप लावून मगच खावे. तूप लावल्याने असे पदार्थ सहजपणे पचण्यास मदत होते आणि ते खाताना देखील त्यांची चव अधिक चांगली लागते.
(सोशल मीडियावरून साभार)