शिरुरमध्ये भरदिवसा घरफोडी; सव्वातीन लाखांचे सोने-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील जोशीवाडी परिसरात भरदिवसा घरफोडी करुन अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दि २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान हि घटना घडली. घराच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केल्यानंतर चोरट्याने लोखंडी कपाटाचे लॉक फोडले आणि त्यातील मौल्यवान ऐवज घेऊन पोबारा केला. या घटनेमुळे जोशीवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.

दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश…

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रतीक आदिनाथ माने यांचे शिरुर शहरातील जोशीवाडी येथे राहते घर आहे. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील हॉलमध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचे लॉक फोडून कपाटातील सामान अस्ताव्यस्त केले.

तसेच कपाटामध्ये ठेवलेली रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख २५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला. भरदिवसा घडलेल्या या घटनेत चोरट्याने घरातील सुरक्षिततेला आव्हान देत मौल्यवान ऐवजावर डल्ला मारला.

नेमका किती ऐवज चोरीला गेला…?

या घरफोडीत ४० हजार रुपयांची रोख रक्कम, १ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, ५५ हजार रुपयांचे सोन्याचे कानातील झुमके, ३३ हजार रुपयांची महिलांची सोन्याची अंगठी, ५५ हजार रुपयांची पुरुषांची सोन्याची अंगठी, १६ हजार ५०० रुपयांची लहान मुलांची सोन्याची अंगठी, ११ हजार रुपयांची सोन्याची नथ, तसेच प्रत्येकी २ हजार ५०० रुपये किमतीची लहान मुलांच्या कमरेतील चांदीची साखळी आणि हातातील चांदीचे कडे चोरीला गेले आहेत. या सर्व ऐवजाची एकूण किंमत ३ लाख २५ हजार ५०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

शिरुर पोलिसांत गुन्हा दाखल; तपास सुरु…

या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केनेकर हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. शिरुर शहरात भरदिवसा घरफोडी करुन लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरीतील आरोपीचा शोध घेऊन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत