शिरुर तालुक्यात उच्चदाब विद्युत वाहिनीचा शॉक बसुन भाजलेल्या ३८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील गोलेगाव येथे विजेच्या खांबावर काम करत असताना उच्चदाब विद्युत वाहिनीचा तीव्र शॉक लागून गंभीररीत्या भाजलेल्या ३८ वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अंशीमन नारायण गायकवाड (वय ३८, रा. गोलेगाव, ता. शिरुर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. पुण्यातील रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

नेमकी घटना काय घडली…?

शिरुर पोलिसांनी दिलेल्या मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, दि २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अंशीमन नारायण गायकवाड हे गोलेगाव येथे विद्युत खांबावर चढले असताना त्यांना उच्चदाब विद्युत वाहिनीचा शॉक लागला. या दुर्घटनेत ते अंदाजे ८० ते ९० टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाले होते.

या घटनेनंतर त्यांना तातडीने शिरुर येथील एका खाजगी रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, मृत्यूशी सुरु असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. शनिवार दि २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शिरुर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिरुर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणी पुणे शहर फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार

गोविंद गुरव यांनी खबर दिली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास शिरुरचे पोलीस हवालदार विनोद मोरे करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत